निमोणे येथे अवैध देशी दारू विक्रीवर शिरूर पोलिसांची कारवाई; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर, प्रतिनिधी :रमेश बनसोडे 

शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निमोणे गावात अवैध देशी दारूची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर शिरूर पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत १,९२० रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपीला नोटीस बजावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास निमोणे गावाच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. राहुल विलास पवार (वय ३५, रा. निमोणे, ता. शिरूर, जि. पुणे) हा त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागील भिंतीच्या आडोशाला देशी दारूचा साठा लपवून ओळखीच्या व्यक्तींना चोरून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता आरोपीकडून ‘टँगो पंच’ कंपनीच्या ९० मिली क्षमतेच्या ४८ सिलबंद देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. प्रत्येकी ४० रुपये किंमतीच्या या बाटल्यांची एकूण किंमत १,९२० रुपये इतकी असून संपूर्ण साठा पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत कोणतेही वाहन अथवा हत्यार आढळून आले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ६०७/२०२६ नोंदविण्यात आला असून आरोपीला नियमानुसार नोटीस देण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीही अवैध दारू विक्रीसंदर्भातील गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे तपासी अधिकारी करीत असून अवैध मद्यविक्रीविरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *