इनामगावच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रवीण घाडगे; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवी दिशा

संपादक – रमेश बनसोडे 

मांडवगण फराटा 

शिरूर तालुक्यातील इनामगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच अत्यंत खेळीमेळीच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झालेल्या निवड प्रक्रियेत सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नव्याने निवड झालेल्या समितीचा कार्यकाळ पुढील दोन वर्षांचा असून, शाळेच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सर्वांगीण विकासासाठी ही समिती प्रभावीपणे कार्य करणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रवीण विलास घाडगे, उपाध्यक्षपदी दादासाहेब पठारे तर सचिव म्हणून मुख्याध्यापक पवळ सर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर ग्रामस्थांनी नवनिर्वाचित अध्यक्षांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी अनिल जाधव सर, बाळासाहेब गांधले, महेश घाडगे, मधुकर घाडगे, सतीश घाडगे, गणेश घाडगे, महादेव राक्षे, अनिल महामुनी, इंद्रजित वाळुंज, नवनाथ घाडगे, सुनील घाडगे, संदीप घाडगे, महेश घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण विलास घाडगे यांनी पालकांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविणे, पटसंख्या वाढविणे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देणे, नियमित उपस्थिती आणि स्वच्छतेला प्राधान्य देणे, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी कला, क्रीडा, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा आणि इतर स्पर्धात्मक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

याशिवाय विविध विभागातील अधिकारी, तज्ज्ञ व मार्गदर्शकांना शाळेत आमंत्रित करून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व प्रेरणादायी व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच तालुक्यातील मल्टिनॅशनल कंपन्यांच्या सीएसआर निधीतून शाळेसाठी क्रीडा साहित्य, आवश्यक सुविधा आणि विविध विकासकामे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शाळा व्यवस्थापन समितीच्या नव्या कार्यकारिणीमुळे शाळेच्या विकासकामांना अधिक गती मिळेल, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत भर पडेल आणि पालक, शिक्षक व ग्रामस्थ यांच्या समन्वयातून न्यू इंग्लिश स्कूल शिक्षणाच्या क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *