शिरूरच्या आनंद सोसायटीत घरात घुसून पिस्तुलातून गोळीबार; घरमालक गंभीर जखमी, अल्पवयीन मुलीलाही दुखापत

शिरूरच्या आनंद सोसायटीत घरात घुसून पिस्तुलातून गोळीबार; घरमालक गंभीर जखमी, अल्पवयीन मुलीलाही दुखापत

 

मांडवगण फराटा प्रतिनिधी : बालाजी कांबळे

शिरूर शहरातील आनंद सोसायटी परिसरात पहाटेच्या सुमारास घरात अनधिकृतपणे प्रवेश करून चोरी केल्यानंतर घरमालकावर पिस्तुलातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना १६ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत घरमालक उमेश चंदनमल छाजेड (वय ४३, व्यवसाय—दुकान, रा. आनंद सोसायटी, शिरूर) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या अल्पवयीन मुलीलाही दुखापत झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

याबाबत उमेश छाजेड यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, पहाटेच्या सुमारास अंदाजे २० ते २५ वर्षे वयोगटातील एका अनोळखी व्यक्तीने घराच्या किचनमधील बंद दरवाजातून घरात अनधिकृत प्रवेश केला. त्यानंतर घरातील मोबाईल फोन चोरी करण्यात आला.

 

दरम्यान, घरात झालेल्या हालचालीची चाहूल लागल्यानंतर उमेश छाजेड यांनी संबंधित व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने “आता तुला जिवंत सोडत नाही,” असे म्हणत त्यांच्या डोक्याच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या गोळीबारात उमेश छाजेड हे गंभीर जखमी झाले.

 

घटनेदरम्यान छाजेड यांच्या अल्पवयीन मुलीच्या हाताला बोचरल्याने तिलाही दुखापत झाली. याचबरोबर शेजारी राहणारे अजित शेठ ओसवाल यांच्या घरातही घरफोडी करून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध दिशांनी तपास सुरू आहे. घरात प्रवेश, चोरीचा प्रयत्न आणि गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

 

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नकाते करीत आहेत.

 

पहाटेच्या वेळी घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे शिरूर शहरातील आनंद सोसायटी परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, अनोळखी आरोपीला लवकरात लवकर ताब्यात घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *