भजन-गीतांच्या माध्यमातून साबळेवाडीत सांस्कृतिक परंपरेचा जागर; अंबिका मातेच्या भक्तीने नवरात्रोत्सवाला लाभली आध्यात्मिक रंगत

भजन-गीतांच्या माध्यमातून साबळेवाडीत सांस्कृतिक परंपरेचा जागर; अंबिका मातेच्या भक्तीने नवरात्रोत्सवाला लाभली आध्यात्मिक रंगत

 सह्याद्रीचा आवाज – अंकुश घारे 

साबळेवाडी, ता. खेड : नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील सांस्कृतिक व भक्तीपरंपरेला उजाळा देणारा उत्सव ठरावा, या भावनेतून अंबिका माता प्रतिष्ठान, साबळेवाडी यांच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भजन व भक्तिगीतांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. अंबिका मातेच्या भक्तीगीतांनी, पारंपरिक भजनांनी आणि भावगीतांच्या सुरेल मैफिलीने साबळेवाडी परिसरात आध्यात्मिक व सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले

गुरुकृपा भजनी मंडळ, सोपान नगर, वडगाव शेरी, पुणे-१४, सद्गुरू कृपा भजनी मंडळ, केंदूर, ता. शिरूर आणि रुक्मिणी महिला भजनी मंडळ, दिघी गाव या तीन मंडळांनी कार्यक्रमात सहभागी होत आपल्या भक्तिमय सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. देवीची भक्तिगीते, पारंपरिक भजने आणि भावगीते यांचे कृतीयुक्त सादरीकरण हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

 

श्री. ज्ञानेश्वर ढवळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजातील पारंपरिक कला, भजनसंस्कृती आणि सांस्कृतिक मूल्ये जतन करण्याचे काम या भजनी मंडळांकडून सातत्याने केले जात असल्याचे यावेळी दिसून आले.

 

कार्यक्रमात हार्मोनियमची साथ सौ. सुयोजना ढवळे मॅडम यांनी केली, तर तबला व ढोलकीची साथ श्री. बापूदादा सुक्रे आणि श्री. प्रतापराव डेरे यांनी दिली. सौ. अनिता नवले, मनिषा थिटे, खुशाली देऊळकर, इंदुमती दराडे, हेमा साकोरे, कीर्ती ताई साकोरे, सविता शेंडकर, अर्चना डेरे, कार्तिकी डेरे, मनिषा ताई साकोरे, रुपाली डुकरे आणि मोनाली गावडे यांनी भक्तिगीते व देवीची गाणी सादर करून वातावरणात भक्तिरस निर्माण केला.

 

या कार्यक्रमाला साबळेवाडीचे सरपंच श्री. काटकर, उपसरपंच, उद्योजक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच बालकांनीही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. देवीच्या भक्तिगीतांमध्ये तल्लीन झालेल्या भाविकांनी संपूर्ण कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.

 

कार्यक्रमाचे संयोजन श्री. स्वप्निलशेठ साबळे यांनी केले. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामुळे साबळेवाडी परिसरात भक्तीबरोबरच सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचा जागर झाला. धार्मिक श्रद्धा, लोककला आणि सामूहिक सहभाग यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या स्मरणात राहिला.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *