*सांगलीत घुमणार पुरोगामी विचारांचा हुंकार! देशातील पहिले ‘अखिल भारतीय पुरोगामी साहित्य संमेलन’ संपन्न होणार**
*मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नियोजनाची पहिली बैठक; प्राचार्य पंढरीनाथ आढाळगे यांची माहिती**
*सासवड/* महाराष्ट्राच्या मातीने जगाला समता आणि बंधुतेचा विचार दिला आहे. मात्र, सध्या राजकीय स्वार्थापोटी प्रतिगामी विचारांचा छुप्या पद्धतीने सुळसुळाट वाढला असून, तो सामाजिक एकसंघतेला वाळवीप्रमाणे पोखरत आहे. केवळ व्यासपीठावरून पुरोगामीत्वाच्या गप्पा न मारता, तो विचार तळागाळातील सामान्य माणसाच्या रक्तात रुजला पाहिजे. याच ध्येयाने प्रेरित होऊन, केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिले ‘अखिल भारतीय पुरोगामी साहित्य संमेलन’ सांगलीच्या क्रांतीनगरीत आयोजित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पुरोगामी संघर्ष परिषदेच्या सल्लागार कमिटीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्राचार्य पंढरीनाथ आढाळगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
डॉ. प्रा. सुभाष वायदंडे : पुरोगामी चळवळीचे अग्रणी नेतृत्व
या संमेलनाच्या संकल्पनेमागे पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक डॉ. प्रा. सुभाष वायदंडे यांची दूरदृष्टी आणि आग्रही भूमिका आहे. डॉ. प्रा. सुभाष वायदंडे यांनी आयुष्यभर सामाजिक न्यायासाठी संघर्ष केला असून, साहित्याच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन व्हावे यासाठी ते या संमेलनाचे मुख्य सूत्रधार म्हणून अग्रेसर राहिले आहेत. त्यांच्याच खंबीर नेतृत्वाखाली हे संमेलन मूर्त स्वरूप घेत असून, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सांगली येथे होणाऱ्या बैठकीत त्यांच्या अध्यक्षतेखाली ५१ लोकांची ‘वर्किंग कमिटी’ निवडली जाणार आहे.
ज्येष्ठ नेते खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते उद्घाटन
राजकारणात आणि समाजकारणात पुरोगामी विचारांची आजच्या काळात नितांत गरज आहे. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून, या संमेलनाचे उद्घाटन देशाचे उत्तुंग नेतृत्व खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्तेच व्हावे, यासाठी डॉ. प्रा. सुभाष वायदंडे आग्रही आहेत. वर्किंग कमिटीची स्थापना होताच डॉ. प्रा. सुभाष वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्याचे माजी अर्थमंत्री
आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ पवार साहेबांची भेट घेऊन त्यांना रीतसर निमंत्रण देणार आहे.
प्रतिगामी लाटेत पुरोगामी
विचारांचा पहाड उभा करणार!
प्राचार्य पंढरीनाथ आढाळगे यांनी प्रसिद्धीपत्रकात पुढे नमूद केले की, “आज देशात विचारांचे प्रदूषण वाढत असताना महाराष्ट्राने पुन्हा एकदा दीपस्तंभाप्रमाणे उभे राहणे गरजेचे आहे. प्रतिगामी विचारांच्या वाऱ्यात पुरोगामी विचारांचा अभेद्य पहाड निर्माण करणे ही काळाची हाक आहे. डॉ. प्रा. सुभाष वायदंडे यांच्या नेतृत्वाखालील हे संमेलन केवळ साहित्यिक चर्चांचे केंद्र न राहता, समतावादी समाजाच्या निर्मितीसाठी एक मोठी चळवळ ठरेल.”
सांगली नगरीत होणारे हे संमेलन देशाच्या वैचारिक इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले जाईल, असा विश्वासही प्राचार्य आढाळगे यांनी व्यक्त केला आहे





