इंदापूर | प्रतिनिधी शाम जगताप
इंदापूर तालुक्यातील कळंब येथील इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
महाविद्यालयाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रकाश कदम व संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना सचिव विरसिंह रणसिंग यांनी विद्यार्थ्यांनी सातत्य, मेहनत व जिद्द यांच्या जोरावर आपले ध्येय गाठावे, असे आवाहन केले. उपाध्यक्ष प्रकाश कदम यांनी स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य विकसित करून समाजात आदर्श निर्माण करावा, असे मत व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, वेळेचे व्यवस्थापन व सकारात्मक दृष्टीकोन यांचे महत्त्व पटवून देत भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात गौरव प्राप्त विद्यार्थ्यांनी आपल्या यशामागील अनुभव कथन करत उपस्थितांना प्रेरित केले. त्यांच्या यशोगाथांमुळे वातावरण प्रेरणादायी बनले होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपप्राचार्य प्रशांत शिंदे यांनी केले, तर वार्षिक अहवालाचे वाचन उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सोनाली चव्हाण, क्रीडा संचालक सुहास भैरट व प्रा. विद्या गुळीग यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. रामचंद्र पाखरे यांनी आभार प्रदर्शन केले.
या प्रसंगी प्रा. विलास बुवा, प्रा. विजय केसकर, प्रा. राजेंद्रकुमार डांगे, प्रा. ज्योत्स्ना गायकवाड, ग्रंथपाल विनायक शिंदे यांसह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
एकूणच, विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा हा सोहळा प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक ठरला.





