प्रतिनिधी – विकास साळुंके
दौंड तालुक्यातील वडारगल्ली परिसरात एका वृद्ध महिलेच्या घरात घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वैमनस्यातून झालेल्या या हल्ल्यात महिलेचा हात फ्रॅक्चर झाला असून तिच्या सुनेवर व नातवावरही हल्ला करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पापाबाई सोमा पवार (वय 60) या मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. 14 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा अशोक, सून मथुरा आणि नातू हरिष हे गुजरातहून दौंड येथे आले होते. त्याच वेळी आरोपी आदि रमेश पवार, रमेश काळू पवार आणि तुषार शिवरकर हे तिघेही त्यांच्या घरासमोर येऊन जुन्या वादातून शिवीगाळ करत दगडफेक करू लागले.
परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच पापाबाई यांनी घराचा दरवाजा बंद केला. मात्र आरोपींनी दरवाज्यावर लाथा मारत तोडफोड करून घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यानंतर आदि पवार याने पापाबाई यांच्या डाव्या हातावर लाकडी काठीने जबर मारहाण केली. या हल्ल्यात त्या खाली कोसळल्या आणि मोठ्याने आरडाओरडा करू लागल्या.
दरम्यान, इतर आरोपींनी सून मथुरा आणि नातू हरिष यांनाही लाकडी काठ्या व दगडांनी मारहाण केली. जीव वाचवण्यासाठी दोघांनी घराच्या मागील दरवाजातून पळ काढला. आरोपींनी यानंतर घराबाहेर उभी असलेली मोटारसायकल फोडून नुकसान केले आणि घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेनंतर पापाबाई यांचा मुलगा अशोक घरी परतला असता त्यांना संपूर्ण प्रकार सांगण्यात आला. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. वैद्यकीय तपासणीत पापाबाई यांच्या हाताचे मनगट फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.





