दौंडमध्ये ‘जल्लोष भीमजयंतीचा – महोत्सव विचारांचा’
न्यू महाराष्ट्र पँथर सेनेतर्फे पत्रकार मिलिंद शेंडगे यांचा गौरव
पाटस प्रतिनिधी – योगेश राऊत
दौंड : न्यू महाराष्ट्र पँथर सेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘जल्लोष भीमजयंतीचा – महोत्सव विचारांचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यंदा पत्रकारितेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘दैनिक जनप्रवास’चे पत्रकार मिलिंद शेंडगे यांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
पत्रकार मिलिंद शेंडगे यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न अत्यंत निर्भीडपणे मांडले आहेत. तसेच चॅनलच्या माध्यमातून समाजातील सत्य परिस्थिती समोर आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीची आणि पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन न्यू महाराष्ट्र पँथर सेनेने त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले.
गेल्या पाच वर्षांपासून न्यू महाराष्ट्र पँथर सेना हा उपक्रम राबवत असून, विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा कार्यक्रमाची सुरुवात ११ एप्रिल रोजी ‘सन्मान स्त्री शक्तीचा – होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाने झाली. महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या विशेष स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १२ एप्रिल रोजी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मानवतावादी दृष्टिकोनातून अन्नदान आणि आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. महापुरुषांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुस्तकांचे मोफत वाटप देखील करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यू महाराष्ट्र पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष पँथर जयदीप बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष श्रीकांत थोरात, उपाध्यक्ष अर्जुन गायकवाड आणि न्यू महाराष्ट्र पँथर सेनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले. या सोहळ्यास दौंडमधील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
“सर्वसामान्य जनतेच्या आणि कामगारांच्या हक्कासाठी आमची संघटना सदैव तत्पर आहे. या जयंती उत्सवाच्या माध्यमातून समाजात वैचारिक परिवर्तन घडवण्याचा आमचा मानस आहे,” – पँथर जयदीप बगाडे (संस्थापक/अध्यक्ष, न्यू महाराष्ट्र पँथर सेना)




