“उदगीरमध्ये पत्रकारांचा महासंगम; 44 व्या राष्ट्रीय अधिवेशनाला दिग्गजांची उपस्थिती, माध्यमांच्या भूमिकेवर होणार सखोल चर्चा”

मुंबई / उदगीर : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन 18 व 19 एप्रिल 2026 रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे मोठ्या उत्साहात पार पडणार असून, या अधिवेशनाकडे राज्यासह देशभरातील पत्रकारांचे लक्ष लागले आहे. तब्बल 2500 हून अधिक पत्रकार या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याने उदगीर शहर पत्रकारांच्या महासंगमाचे केंद्र ठरणार आहे.
या भव्य अधिवेशनाचे उद्घाटन 18 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुल येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. लोकमतचे समूह संपादक राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार असून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले स्वागताध्यक्ष म्हणून तर आमदार संजय बनसोडे सह-स्वागताध्यक्ष म्हणून कार्यक्रमाची धुरा सांभाळणार आहेत. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.
अधिवेशनाची सुरुवात प्रभात फेरीने होणार असून उदगीर शहरातील विविध शाळांतील विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत. दुपारच्या सत्रात पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार व मनोगत कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर “लोकप्रतिनिधींच्या माध्यमांकडून अपेक्षा” या विषयावर आमदार रोहित पवार यांची विशेष मुलाखत घेतली जाणार आहे. रात्री “लोककलेचा जागर” या सांस्कृतिक कार्यक्रमाने पहिल्या दिवसाचा समारोप रंगणार आहे.
दुसऱ्या दिवशी 19 एप्रिल रोजी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. पुढे “माध्यमं सत्ताधाऱ्यांना झुकतं माप देताहेत का?” या अत्यंत चर्चेच्या विषयावर विविध राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांमध्ये परिसंवाद रंगणार असून, यात माध्यमांच्या निष्पक्षतेवर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई पत्रकारांची भूमिका मांडणार आहेत.
त्यानंतर “टीव्हीच्या पडद्यावरची दुनिया” या विषयावर नामांकित पत्रकार व मीडिया व्यक्तिमत्त्वे आपले अनुभव मांडणार आहेत. या चर्चांमुळे बदलत्या माध्यमविश्वाचा वेध घेण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे.
दुपारी 3 ते 5 या वेळेत समारोप समारंभ पार पडणार असून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, ‘जय महाराष्ट्र’चे संपादक प्रसाद काथे आणि ‘मुक्तपीठ’चे संपादक तुळशीदास भोईटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेळी लातूर जिल्ह्यातील मान्यवर पत्रकारांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या अधिवेशनाच्या निमित्ताने पत्रकारितेतील बदलते प्रवाह, माध्यमांची जबाबदारी, सत्ताधाऱ्यांशी असलेले संबंध आणि डिजिटल मीडियाचे वाढते महत्त्व या सर्व विषयांवर व्यापक चर्चा होणार असून, हे अधिवेशन पत्रकारांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, राज्यभरातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *