पाटस भानोबानगरमध्ये बुधराणी हॉस्पिटलतर्फे डोळे तपासणी शिबिर संपन्न
पाटस प्रतिनिधी – योगेश राऊत
पाटस येथील भानोबानगर परिसरात सामाजिक बांधिलकी जपत “बुधराणी हॉस्पिटल”च्या वतीने डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भानोबानगर (मराठी शाळा) येथे सोमवारी पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरामध्ये नागरिकांची सखोल डोळे तपासणी करण्यात आली. विशेषतः मोतीबिंदूच्या रुग्णांचे निदान करून त्यांना शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करून देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. तसेच गरजू नागरिकांना अल्प दरात उच्च दर्जाचे चष्मे उपलब्ध करून देण्यात आले. डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठीही विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या.
सरकारी आरोग्य योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले असल्याचे ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल भागवत यांनी सांगितले. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा सुलभ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या शिबिरासाठी डॉ. बाळासाहेब नाथा धुमाळ व डॉ. राजश्री बाळासाहेब धुमाळ (सहाय्यक) यांनी वैद्यकीय सेवा दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बाळासाहेब भागवत, भारत जाधव, गौरव भागवत, विनायक भागवत, अशोक कोकरे, नामदेव टिळेकर, राहुल कुलाळ, मोहन, योगेश टिळेकर, नवनाथ टिळेकर, प्रशांत भागवत, कोकरे, उत्तम तोंडे, भाऊ तोंडे, मारुती डूबे, सुहास भागवत, मोहन चोरमले, विठ्ठल चोरमले आदींनी सहकार्य केले.
या शिबिरामुळे परिसरातील अनेक नागरिकांना डोळ्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता मिळाली असून, गरजू रुग्णांना उपचाराचा मार्गही खुला झाला आहे.




