दौंडमध्ये आंबेडकर चौकात मध्यरात्री गोंधळ; पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपाने मोठा अनर्थ टळला

दौंड, दि. 15 (प्रतिनिधी):विकास साळुंके
दौंड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भीम जयंतीच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्रीच्या सुमारास काही तरुणांमध्ये साऊंड सिस्टिमच्या कारणावरून जोरदार वाद होऊन झोंबाझोंबी व मारामारीची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणत संभाव्य मोठा अनर्थ टाळला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 13 एप्रिलच्या रात्रीपासून 14 एप्रिलच्या सकाळपर्यंत रात्रगस्तीसाठी पोलीस उपनिरीक्षक बबन जयवंत जाधव व त्यांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान, 14 एप्रिल रोजी पहाटे सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास आंबेडकर चौकात काही व्यक्तींमध्ये साऊंड वाजविण्यावरून वाद सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या ठिकाणी आधीच बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांनी संबंधितांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थितांनी पोलिसांचे म्हणणे न ऐकता एकमेकांशी झोंबाझोंबी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होण्याची परिस्थिती निर्माण झाली.
घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सर्व पोलिसांनी एकत्रित प्रयत्न करून संबंधित व्यक्तींना वेगळे करत वाद शांत केला. तसेच, परिसरात जमलेली गर्दी पांगवून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू न देता कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात पोलिसांना यश आले.
या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीसांकडून सुरू आहे.
दरम्यान, भीम जयंतीसारख्या संवेदनशील व महत्त्वाच्या दिवशी नागरिकांनी शांतता व संयम राखण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *