कांद्याला भाव न मिळाल्याने बाभूळसर बुद्रुक येथील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
शिरूर (प्रतिनिधी)- अल्लाउद्दीन अलवी

– शिरूर तालुक्यातील बाभूळसर बुद्रुक येथील शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा कांद्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा आता पावसाळी हवामानामुळे काळा पडू लागला असून मोठ्या प्रमाणात सडायला सुरुवात झाली आहे.

माजी सरपंच सतिश पोपटराव नागवडे यांच्या कांदा वखारीत मोठ्या प्रमाणात कांदा साठवलेला होता. परंतु बाजारात कांद्याला योग्य दर न मिळाल्याने विक्री न करता शेतकऱ्यांनी तो गोदामातच ठेवला. आता वातावरणातील आर्द्रतेमुळे आणि पावसाच्या ओलाव्यामुळे कांद्याची कुज सुरू झाली असून साधारण चार ते साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे अंदाजे गणित आहे.

या घटनेमुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत. “खत, औषधे, मजुरी याचा खर्च करून पिकवलेला कांदा जर अशा प्रकारे सडून गेला तर शेतकऱ्याने जगायचे कसे?” असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.
नागवडे व परिसरातील शेतकऱ्यांनी संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ जागेवर पंचनामा करून योग्य ती नोंद घ्यावी, अशी मागणी केली आहे.

ग्रामीण भागात कांद्याचे दर पाडले गेल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.






