सावनेर मार्गावर जीवघेणा प्रवास; बेकायदेशीर दारूविक्रीमुळे धोका वाढला

प्रतिनिधी नागपूर – अनिकेत उमरेडकर 

दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी सावनेर–नागपूर तसेच नागपूर–कळमेश्वर, सावनेर–खुरसापार, खापा–पारशिवनी या प्रमुख मार्गांवर वाढत्या अपघातांमागील धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या मार्गांवरील काही धाब्यांवर बेकायदेशीररित्या दारू विक्री होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक धाब्यांवर ग्राहकांना जागेवरच बसून मद्यपान करण्याची मुभा दिली जाते. परिणामी, वाहनचालक धाब्यांवर थांबून मद्यपान करतात आणि त्यानंतर नशेतच वाहन चालवतात. यामुळे या मार्गांवर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, काही धाबे रात्री उशिरापर्यंत सुरू राहतात आणि मद्यपानासाठी विशेष व्यवस्था केली जाते. हे प्रकार उघडपणे सुरू असतानाही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, काल झालेल्या अपघातात एका व्यक्तीच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले की, “मोठा अपघात होण्यापूर्वीच कठोर कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल.”
स्थानिक नागरिकांनी संबंधित धाब्यांवर तात्काळ छापे टाकून बेकायदेशीर दारूविक्री थांबवावी, तसेच मद्यधुंद वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *