नक्षत्र वनी उमललेले स्वप्न : केडगावात स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचाचा उपक्रम

 

नक्षत्र वनी उमललेले स्वप्न : केडगावात स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचाचा उपक्रम

दौंड (प्रतिनिधी विकास साळुंके) 

मानवी जीवनात निसर्गाचा श्वास किती महत्वाचा आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण निसर्गाला विज्ञान व अध्यात्माशी जोडून समाजासमोर एक वेगळा प्रयोग साकारला आहे स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचाने.

केडगाव येथील चौरंगीनाथ पर्वतरांगांलगत उभारण्यात आलेल्या नक्षत्रवनाचा आठवा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. डॉक्टर निलेश लोणकर यांच्या संकल्पनेतून उभे राहिलेले हे वन आज केवळ हरितदृष्टीच नव्हे तर ज्ञानदृष्टी व अध्यात्मिकदृष्टीने देखील एक आगळा ठरला आहे.

 नक्षत्र आणि झाडांचा अनोखा संगम

या वनामध्ये लावण्यात आलेल्या प्रत्येक झाडाचे नाते एखाद्या नक्षत्राशी जोडले गेले आहे. आपला जन्म कोणत्या नक्षत्रात झाला आणि त्या नक्षत्राचे प्रतिनिधित्व करणारे झाड कोणते, याची माहिती येथे येणाऱ्यांना दिली जाते. त्यामुळे हे वन फक्त वृक्षारोपणाचे ठिकाण राहिले नाही, तर निसर्गाशी जोडणारा अध्यात्मिक दुवा ठरले आहे.

 धार्मिक–सांस्कृतिक कार्यक्रम

वर्धापन दिनानिमित्त ज्ञानेश्वरीतील ओव्यांचे पठण, होम–हवन व नक्षत्रवन फलक पूजन करण्यात आले. या निमित्ताने वातावरण अधिक पवित्र व भावपूर्ण झाले.

 मान्यवरांची उपस्थिती

या प्रसंगी घायतडक सर, भिसे सर, विठ्ठल कोरफड, आनंद कोथिंबिरे, नामदेव जराड, सतीश गायकवाड, निलेश कुंभार, ग्रामपंचायत सदस्य राजू गायकवाड, प्रसाद बारवकर, सामाजिक कार्यकर्ते मनोज होळकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 सामाजिक उपक्रम

वृद्ध आणि पर्यटकांच्या सोयीसाठी प्रकाश ब्रह्मे यांनी नक्षत्रवनामध्ये चार बेंच उपलब्ध करून दिल्या. त्याबद्दल डॉ. लोणकर यांनी विशेष आभार मानले.

 महाराष्ट्रातील दुर्मिळ ठेवा

संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारची फक्त तीन नक्षत्रवने असल्याचे विशेषत्वाने सांगण्यात आले, त्यामध्ये केडगाव नक्षत्रवन हा एक अद्वितीय ठेवा ठरत आहे

निसर्ग, विज्ञान व संस्कृतीचा त्रिवेणी संगम घडवणारे हे नक्षत्रवन, केडगाव व दौंड तालुक्यासाठी एक अभिमानाचा विषय ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *