हवेली तालुक्यात पाणंद रस्ते आणि ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा आढावा; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना
Rjnews 27मराठी – रमेश बनसोडे.

लोणी काळभोर, दि. २० ऑगस्ट २०२६ : हवेली तालुका पाणंद रस्ते समिती तसेच हवेली तालुका एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी (दि. २०) लोणी काळभोर येथे शिरूर-हवेलीचे आमदार तथा दोन्ही समित्यांचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली कटके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत हवेली तालुक्यातील पाणंद, शिवरस्ते व शेतरस्त्यांच्या प्रलंबित प्रश्नांसह ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

काही दिवसांपूर्वी थेऊर येथे झालेल्या समाधान शिबिरात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर बैठकीत तालुक्यातील विविध पाणंद, शिवरस्ते आणि शेतरस्त्यांबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावांची माहिती घेण्यात आली. संबंधित रस्त्यांची सद्यस्थिती, आवश्यक कामांचे स्वरूप, अंदाजित खर्च, उपलब्ध निधी तसेच अतिरिक्त निधीची आवश्यकता याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेण्यात आली.

हवेली तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाळ्यात पाणंद आणि शेतरस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होत असल्याने शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करताना तसेच शेतीची कामे करताना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना बारमाही व सुस्थितीत रस्ते उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य देण्याच्या सूचना आमदार कटके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
रस्त्यांशी संबंधित प्रश्न सोडविताना महसूल विभाग, भूमीअभिलेख, वन विभाग, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन, पंचायत समिती आणि ग्रामपातळीवरील संबंधित यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. प्रशासकीय अथवा तांत्रिक कारणांमुळे रखडलेली कामे तातडीने मार्गी लावून प्रलंबित प्रस्तावांवर ठोस कार्यवाही करण्याचेही निर्देश बैठकीत देण्यात आले.
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचाही सविस्तर आढावा
याच बैठकीत हवेली तालुका एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीच्या माध्यमातून तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. आरोग्य केंद्रांमधील उपलब्ध मनुष्यबळ, औषधसाठा, वैद्यकीय उपकरणे, रुग्णांना उपलब्ध होणाऱ्या आरोग्य सेवा आणि दैनंदिन कामकाजाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया तसेच इतर संसर्गजन्य व मौसमी आजारांचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. गावागावात आरोग्यविषयक जनजागृती, आवश्यक ठिकाणी तपासणी शिबिरे, स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर देण्याचे निर्देश देण्यात आले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, नियमित लसीकरण मोहीम आणि विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांच्या माध्यमातून वेळेत, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार कटके यांनी दिले.
आरोग्य केंद्रांमध्ये औषधांची कमतरता भासू नये, आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध राहाव्यात तसेच मनुष्यबळाच्या उपलब्धतेसंदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
“बैठकीपुरते निर्णय नको, त्याचे परिणाम जमिनीवर दिसले पाहिजेत”
यावेळी आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके म्हणाले, “शेतकऱ्यांसाठी पाणंद, शिवरस्ते आणि शेतरस्ते हे केवळ रस्ते नसून त्यांच्या शेतीशी आणि उपजीविकेशी जोडलेले मूलभूत मार्ग आहेत. त्यामुळे या रस्त्यांचे प्रश्न प्रलंबित न ठेवता उपलब्ध निधी आणि प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून ते तातडीने मार्गी लावणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणे हीदेखील आपली प्राथमिक जबाबदारी आहे.”
ते पुढे म्हणाले, “रस्ते असोत किंवा आरोग्य सुविधा, नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि समस्या सोडविण्यासाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय ठेवून केवळ बैठका घेण्यापेक्षा त्याचे ठोस परिणाम जमिनीवर दिसले पाहिजेत. त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील.”
दरम्यान, हवेली तालुक्यातील पाणंद, शिवरस्ते व शेतरस्त्यांसह ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील प्रलंबित प्रश्नांचा नियमित आढावा घेऊन त्यांचा पाठपुरावा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे संबंधित विभागांकडून प्रलंबित कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.




