घराच्या उंबरठ्यावर मृत्यूची चाहूल! इनामगावच्या नलगे मळ्यात बिबट्याचा थरार; कुत्र्याला उचलून नेल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

शिरूर (पुणे) प्रतिनिधी : रमेश बनसोडे 

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील इनामगाव येथील नलगे मळा परिसरात शुक्रवारी रात्री सुमारे ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या बिबट्याच्या थरारक वावराने ग्रामस्थांची झोप उडाली आहे. धोंडीबा शंकर घाडगे यांच्या घराच्या अगदी उंबरठ्यापर्यंत बिबट्या पोहोचल्याने त्यांच्या कुटुंबावर अक्षरशः जीवघेणा प्रसंग ओढवला होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र शेजाऱ्याचा कुत्रा बिबट्याने उचलून नेल्याने परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.

धोंडीबा घाडगे यांनी सांगितले की, “मी रात्री रस्त्यावर उभा राहून एका वाहनाची वाट पाहत होतो. एक गाडी दूरवर दिसली, पण ती पुढे आली नाही. त्यामुळे मी घरात येऊन पत्नीला सांगितले की, कदाचित त्या वाहनचालकाला बिबट्या दिसला असावा म्हणून तो पुढे आला नसावा. आम्ही दरवाजाजवळ बोलत असतानाच अचानक आमचे लक्ष नसताना बिबट्या थेट घराच्या व्हरांड्यात आला. काही क्षण तो दरवाजासमोर थांबला आणि नंतर मागे फिरला.”

यानंतर बिबट्याने शेजारील घराजवळील कुत्र्यावर झडप घालत त्याला उचलून नेले. हा प्रकार पाहून घाडगे यांनी तात्काळ घटनास्थळी असलेल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यांनी अधिकाऱ्यांना संपूर्ण घटना सांगितली. इतक्यात बिबट्या पुन्हा कुत्रा तोंडात धरून घराजवळील परिसरात दिसल्याचेही त्यांनी अधिकाऱ्यांना दाखवून दिले. घरासमोरील फरशीवर उमटलेले बिबट्याच्या पंजांचे ठसेही त्यांनी अधिकाऱ्यांना दाखवले.

मात्र, घाडगे यांचा आरोप आहे की, वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वाहन, ड्रोन आणि इतर साधने असूनही रात्री कोणतीही तातडीची कारवाई करण्यात आली नाही. “अधिकाऱ्यांना बिबट्या आधीच दिसला होता. त्यांनी आम्हाला किंवा गावकऱ्यांना वेळेवर सूचना दिली असती, तर आम्ही अधिक सावध राहिलो असतो. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, पण हा निष्काळजीपणा गंभीर आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी याच नलगे मळा परिसरात शरद नलगे यांच्या कुटुंबालाही अशाच प्रकारचा अनुभव आला होता. त्यामुळे या परिसरात एक नव्हे तर अनेक बिबटे वावरत असल्याचा दावा स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

रात्री शेतीला पाणी देण्यासाठी किंवा इतर कामांसाठी बाहेर पडावे लागते. अशा परिस्थितीत जीव मुठीत धरून काम करावे लागत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. वन विभागाने रात्री गस्त घालताना बिबट्याचा वावर आढळल्यास तातडीने व्हॉट्सअॅप संदेश, गावातील सूचना प्रणाली किंवा अन्य माध्यमातून नागरिकांना सतर्क करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

शनिवारी सकाळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, वाढत्या बिबट्याच्या वावरामुळे नलगे मळा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम असून, वन विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *