शिरूर, दि. १ ऑगस्ट : रमेश बनसोडे
शिरूर-हवेली मतदारसंघातील वाढती वाहतूक कोंडी, अपुरी पायाभूत सुविधा आणि विविध प्रलंबित विकासकामांच्या पार्श्वभूमीवर आमदार माऊली आबा कटके यांच्या पुढाकारातून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) चे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी (भा.प्र.से.) यांनी शनिवारी मतदारसंघातील विविध भागांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा करून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासकामांना गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
पाहणी दौऱ्यादरम्यान आव्हाळवाडी, वाडेबोलाई, मांजरी खुर्द, थेऊर, प्रयागधाम, कोरेगाव, टाकळी भीमा, सनसवाडी, कोरेगाव भीमा, पिंपळे जगताप, लोणीकंद, भावडी, लोहगाव रस्ता, वाघेश्वर मंदिर परिसर, तुळापूर आणि बकोरी मार्ग या परिसरांना भेट देण्यात आली. या ठिकाणी वाढत्या वाहतूक कोंडीची कारणे, रस्त्यांची सद्यस्थिती, भविष्यातील वाहतूक नियोजन, नागरिकांच्या मूलभूत सुविधा तसेच विविध प्रलंबित विकासकामांचा सखोल आढावा घेण्यात आला.

यावेळी आमदार माऊली आबा कटके यांनी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने मांडण्यात येणाऱ्या अडचणी आणि मागण्या PMRDA आयुक्तांसमोर मांडल्या. वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी रस्त्यांचे रुंदीकरण, पर्यायी मार्गांची उभारणी, आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करणे तसेच रखडलेल्या विकासकामांना प्राधान्याने मंजुरी व गती देण्याबाबत संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
PMRDA आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सर्व ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागांकडून तांत्रिक माहिती घेतली. प्रत्येक प्रकल्पाचा सखोल अभ्यास करून प्राधान्यक्रमानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येईल आणि विकासकामांमध्ये अनावश्यक विलंब होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी आमदार माऊली आबा कटके यांनी शिरूर-हवेली मतदारसंघाचा सर्वांगीण विकास, सुरक्षित व सुरळीत वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणींचे कायमस्वरूपी निराकरण हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून विकासकामांना अधिक गती दिली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या पाहणी दौऱ्यामुळे शिरूर-हवेली मतदारसंघातील वाहतूक समस्या आणि प्रलंबित विकासकामांच्या संदर्भात प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही होण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.




