कॉम्प्युटर क्लाससाठी गेलेली २० वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता; युवकावर संशय, शिरूर पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

Rjnews 27मराठी – रमेश बनसोडे 

शिरूर, प्रतिनिधी : शिरूर शहरातील कॉम्प्युटर क्लाससाठी घरातून गेलेली २० वर्षीय विद्यार्थिनी रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. दिवसभर नातेवाईकांनी व मित्रपरिवारात शोध घेतल्यानंतरही तिचा ठावठिकाणा लागला नसल्याने कुटुंबीयांनी शिरूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणात एका युवकावर संशय व्यक्त करण्यात आला असून पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीची नोंद करून शोधमोहीम सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिक्षा संभाजी पवार (वय २०) ही मूळची निमोणे (ता. शिरूर) येथील रहिवासी असून सध्या बाबुरावनगर, अष्टविनायक कॉलनी, शिरूर येथे कुटुंबासह वास्तव्यास आहे. ती शिक्षण घेत असून शनिवारी (४ जुलै) सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास शिरूर येथील दिव्या कॉम्प्युटर क्लासमध्ये जाण्यासाठी घरातून निघाली होती. मात्र, ती क्लासमध्ये पोहोचली नसल्याचे समोर आले.

दिवसभर ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा नातेवाईक, मैत्रिणी तसेच शिरूर शहर परिसरात शोध घेतला. मात्र कोणतीही माहिती न मिळाल्याने अखेर शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. तक्रारीत आलेगाव पागा येथील संकेत दादासाहेब ढोले या युवकावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी या अनुषंगाने तपास सुरू केला असून संबंधित युवकासह विविध बाजूंनी चौकशी केली जात आहे.

बेपत्ता विद्यार्थिनीचा रंग गोरा, चेहरा गोल, उंची सुमारे पाच फूट, बांधा सडपातळ, काळे लांब केस असून ती घरातून निघताना चॉकलेटी रंगाचा पंजाबी ड्रेस व पायात चप्पल परिधान केलेली होती. ती मराठी व हिंदी भाषा बोलते.

शिरूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संबंधित विद्यार्थिनीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने शिरूर पोलीस स्टेशन किंवा तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधावा, जेणेकरून तिचा लवकरात लवकर शोध घेणे शक्य होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *