नागरगाव | प्रतिनिधी – विजय कांबळे
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या एका इसमाविरुद्ध शिरूर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय तसेच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या व्यक्तीने पूर्वपरवानगी न घेता बंदी असलेल्या हद्दीत प्रवेश केल्याचे उघड झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश तुकाराम देवकर (वय ३०, रा. कवठे येमाई, ता. शिरूर, जि. पुणे) यास ४ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास कवठे येमाई गावाच्या हद्दीत ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला शिरूर पोलीस ठाण्यात आणून त्याच्यावरील हद्दपार आदेशाची नोंद तपासण्यात आली.
अभिलेख पडताळणीत माननीय उपविभागीय दंडाधिकारी, पुणे उपविभाग यांनी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार योगेश देवकर यास दोन वर्षांच्या कालावधीसाठी पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यांच्या हद्दीतून तडीपार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
मात्र, संबंधित आदेशाची अट मोडून उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तो बंदी असलेल्या परिसरात वावरत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियम कलम १४२ अंतर्गत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार काळे यांनी फिर्याद दिली असून, पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय खाटीग पुढील तपास करीत आहेत. हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.




