Rjnews27 मराठी रमेश बनसोडे
आरजे न्यूज 27 मराठी विशेष जनहित वृत्त
सध्या शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत चायनीज खाद्यपदार्थांची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चायनीज राईस, नूडल्स आणि विशेषतः चिकन लॉलीपॉप हे पदार्थ तरुणाईपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्याच पसंतीस उतरले आहेत. मात्र, या लोकप्रियतेचा फायदा घेत काही खाद्य विक्रेते ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचे चित्र समोर येत आहे.
चिकन लॉलीपॉपच्या एका प्लेटसाठी ग्राहकांकडून 140 ते 150 रुपये आकारले जातात. मात्र, प्रत्यक्षात दिल्या जाणाऱ्या लॉलीपॉपमध्ये चिकनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचा आरोप अनेक ग्राहकांकडून केला जात आहे. काही ठिकाणी तर चिकनपेक्षा कॉर्नफ्लॉवर, मैदा आणि विविध पीठांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे.
ग्राहकांना चिकनच्या नावाखाली मोठ्या आकाराचे लॉलीपॉप दिले जातात, परंतु त्यामध्ये असलेला चिकनचा तुकडा अत्यंत लहान असतो. परिणामी ग्राहकांना महागडे चिकन खाल्ल्याचा भास निर्माण केला जातो, पण प्रत्यक्षात ते मोठ्या प्रमाणात पीठ आणि मसाल्यांचे मिश्रण खात असल्याची भावना व्यक्त होत आहे.
अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) तसेच स्थानिक अन्न व औषध प्रशासनाने अशा खाद्यपदार्थांची तपासणी करून ग्राहकांना नेमके काय दिले जात आहे याची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.
आरजे न्यूज 27 मराठी जनहिताच्या दृष्टीने हा मुद्दा पुढे आणत असून ग्राहकांनीही खाद्यपदार्थांची गुणवत्ता, प्रमाण आणि किंमत याबाबत जागरूक राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.




