शिरूर, प्रतिनिधी | RJNEWS27 मराठी
शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा परिसरात गुरुवारी पहाटे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न भेसळविरोधी पथकाच्या कारवाईची धास्ती घेत अज्ञातांनी तब्बल ३५० किलो खवा शेताशेजारी फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरसगाव काटा परिसरातील शेतकऱ्यांना रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात संशयास्पद खवा पडलेला आढळून आला. सुरुवातीला हा प्रकार नेमका काय आहे, याबाबत संभ्रम होता. मात्र तपासाअंती हा मोठ्या प्रमाणातील खवा असल्याचे स्पष्ट झाले. अन्न व औषध प्रशासनाच्या संभाव्य कारवाईपासून बचाव करण्यासाठी संबंधितांनी हा खवा टाकून घटनास्थळावरून पलायन केल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
विशेष म्हणजे, सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर खवा आणि मिठाईच्या पदार्थांची मागणी वाढत असताना अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात खवा फेकून दिला जाणे संशयाला अधिक खतपाणी घालणारे ठरत आहे. हा खवा विक्रीसाठी नेला जात होता का, त्यामध्ये भेसळीचा प्रकार होता का, किंवा तो निकृष्ट दर्जाचा असल्याने टाकून देण्यात आला का, याबाबत विविध तर्क-वितर्क व्यक्त होत आहेत.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली असून नमुने तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अहवाल आल्यानंतर खव्याची गुणवत्ता, त्यातील घटक आणि त्यामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
या घटनेमुळे शिरूर तालुक्यातील नागरिकांमध्ये अन्नसुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असून, भेसळखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. शिरसगाव काटा परिसरात आढळलेल्या या ३५० किलो खव्यामागील रहस्य उलगडण्यासाठी प्रशासनाकडून तपास सुरू आहे.




