मांडवगण फराटा येथे गावठी हातभट्टीवर धडक कारवाई; ४ लिटर अवैध दारू जप्त, परिसरात खळबळ

शिरूर (प्रतिनिधी) बालाजी कांबळे 

शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे अवैध गावठी हातभट्टी दारू विक्रीवर पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे ४ लिटर दारू जप्त केली. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दि. २५ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे मांडवगण फराटा गावाच्या हद्दीत छापा टाकण्यात आला. या वेळी बाळासाहेब आप्पा आडागळे यांच्याकडे ५ लिटर क्षमतेच्या कॅनमध्ये साठवलेली अंबट व उग्र वासाची गावठी हातभट्टी दारू आढळून आली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित दारू जप्त केली.
जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत अंदाजे ४०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. संपूर्ण कारवाई पंचांच्या उपस्थितीत पार पडली. तसेच जप्त दारूमधून नमुना घेऊन तो सील करण्यात आला आहे.
या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार गवळी करत आहेत. प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, ग्रामीण भागात सुरू असलेल्या अशा अवैध दारू व्यवसायावर पोलिसांनी अधिक कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे मात्र बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांना चांगलाच धडा मिळाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *