प्रतिनिधी – विकास साळुंके
पुणे जिल्हा परिषद, पुणे तसेच पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान 2025–26 अंतर्गत मनोरमा मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्यात प्रथम क्रमांकाचा मान पटकावला आहे. या यशामुळे परिसरात विद्यालयाचा गौरव वाढला असून शिक्षण क्षेत्रात आदर्श निर्माण झाला आहे.
या यशाबद्दल आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर, पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे, पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी श्री. कारेकर तसेच पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. प्रसाद गायकवाड यांच्या हस्ते विद्यालयाचा सन्मान करण्यात आला.
यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या सौ. सुचिता शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवृंदाने घेतलेली मेहनत, विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण प्रगती आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर दिलेला भर यामुळेच हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नांचे हे फलित असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. या यशामुळे पालकवर्गातून समाधान व्यक्त होत असून परिसरातील इतर शाळांसाठीही हा एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.
मनोरमा मेमोरियल हायस्कूलने शैक्षणिक गुणवत्तेच्या बळावर मिळवलेला हा मान केवळ विद्यालयापुरता मर्यादित न राहता संपूर्ण तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देणारा ठरणार आहे.




