प्रतिनिधी : विजय कांबळे
शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे भरदिवसा सार्वजनिक ठिकाणी कोयता घेऊन फिरणाऱ्या एका इसमाला शिरूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ताब्यात घेतल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे 2.40 वाजण्याच्या सुमारास वडगाव रासाई येथील पाण्याच्या टाकीजवळील चौकात पांडुरंग ऊर्फ भावडया मोहन गायकवाड (वय 32) हा इसम संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. त्याच्याकडे लोखंडी पातीचा, लाकडी मुठ असलेला धारदार कोयता होता. तसेच तो एका नंबर नसलेल्या दुचाकीसह फिरत असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले.
सदर प्रकाराची माहिती मिळताच शिरूर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संबंधित इसमाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अंदाजे 300 रुपये किमतीचा कोयता आणि सुमारे 20 हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे शस्त्र घेऊन फिरण्याच्या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून मोठा अनर्थ टाळल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.
या प्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. या कारवाईत पोलीस कर्मचारी भगत यांनी दाखल प्रक्रिया पूर्ण केली असून, तपास पोलीस कर्मचारी शिंदे करत आहेत. शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.




