स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकाचा अवमान; पाटस येथे उमाजी नाईक स्मारकाची तोडफोड

पाटस येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारकाची तोडफोड; दोषींना अटक न झाल्यास महामार्ग रोकोचा इशारा

प्रतिनिधी – योगेश राऊत 
पाटस (ता. दौंड) : कसबे पाटस येथील गावाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. २८ मार्च २०२६) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थ व समाजबांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटस गावातील मुख्य रस्त्यालगत व प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकावरील नावाचा फलक तसेच स्मारकावरील माहितीफलकावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून नुकसान केले. यासोबतच ‘जय मल्हार क्रांती संघटना, महाराष्ट्र राज्य’ या नावाचा फलक देखील फोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. शनिवारी सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.
राज्याच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाची तोडफोड झाल्याने ग्रामस्थ व रामोशी-बेरड समाजबांधवांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत संबंधित अज्ञात समाजकंटकांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करण्यात यावी व त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास पुणे–सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संतप्त नागरिकांकडून देण्यात आला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ रविवारी (दि. २९ मार्च २०२६) सकाळी ९.३० वाजता पाटस येथील आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक चौकातून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये दौंड तालुक्यातील रामोशी-बेरड समाजबांधव तसेच राज्यभरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भात जय मल्हार क्रांती संघटना, दौंड तालुका अध्यक्ष दादासाहेब खोमणे यांनी प्रशासनाला निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. दोषींना लवकरात लवकर अटक न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने घटनेची दखल घेतली असून संबंधित अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *