“महिला सक्षमीकरणासाठी झटणाऱ्या विजय कांबळे यांचा जिल्हास्तरीय गौरव; सामाजिक कार्याला मिळाली दाद”

“महिला सक्षमीकरणासाठी झटणाऱ्या विजय कांबळे यांचा जिल्हास्तरीय गौरव; सामाजिक कार्याला मिळाली दाद”
मांडवगण फराटा : प्रतिनिधी – बालाजी कांबळे
शिरूर तालुक्यात महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विजय कांबळे यांचा  तालुकास्तरीय  पुरस्काराने गौरव करण्यात आला. शनिवार, दि. १८ मार्च २०२६ रोजी न्हावरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन कार्यालयात महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा पुणे संचलित जिजाऊ लोकसंचालित साधन केंद्र, शिरूर तालुका यांच्या वतीने सन २०२५–२०२६ च्या नव तेजस्विनी कार्यक्रमांतर्गत महिला सक्षमीकरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
विजय कांबळे यांनी गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी सातत्याने कार्य केले आहे. बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांना स्वावलंबनाच्या दिशेने मार्गदर्शन करणे तसेच महिलांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबविणे अशी महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांनी केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक महिला बचत गट सक्षम झाले असून आर्थिक नियोजन आणि पारदर्शक लेखाजोखा ठेवण्याची पद्धतही त्यांनी महिलांमध्ये रुजवली आहे.
याशिवाय पत्रकारितेच्या माध्यमातून महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराच्या घटनांना वाचा फोडत समाजात जनजागृती करण्याचे कार्यही त्यांनी सातत्याने केले आहे. महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधणे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठविणे या माध्यमातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. तसेच RJE न्यूज पेपरच्या वर्धापन दिनानिमित्त मांडवगण फराटा येथे जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याचा उपक्रमही त्यांनी राबविला होता. या सर्व सामाजिक कार्याची दखल मान्यवरांनी यावेळी घेतली.
महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या या कार्याची दखल घेत संबंधित संस्थेच्या सुजाता इंगळे मॅडम व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावाची पुरस्कारासाठी शिफारस केली होती. त्यानंतर शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी या निवडीस मान्यता देत त्यांचा सन्मान निश्चित केला.
या प्रसंगी अँड लता चाबुकस्वार, मीनाक्षीताई कोरेकर (अध्यक्ष, जिजाऊ लोकसंचालित साधन केंद्र), अमीदा शेख (उपाध्यक्ष), रेखा जराड (सचिव), जयवंत भगत (कृषी अधिकारी, न्हावरा), मोनिका मोहिते (संस्था व्यवस्थापक), माधुरी पंडित मॅडम, नागरगावचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य हरिभाऊ शेलार, हंबीर शेलार सर तसेच परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्यामुळे विजय कांबळे यांचे विविध स्तरातून कौतुक होत असून त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना नवी प्रेरणा मिळत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *