शिक्रापूर प्रतिनिधी : अंकुश घारे
महाराष्ट्र-मध्यप्रदेशात घरफोड्या करणारा सराईत आरोपी जेरबंद; २४.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
शिक्रापूर, दि. ७ सप्टेंबर : महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील विविध ठिकाणी घरफोडी व चोरीचे गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा आणि शिक्रापूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे १६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच एक मोटारसायकल असा एकूण २४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, त्याच्याकडून शिक्रापूर व शिरूर परिसरातील तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढलेल्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखा तसेच संबंधित पोलीस ठाण्यांच्या तपास पथकांची बैठक घेऊन मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले होते. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत घरफोडीच्या घटनांचा बारकाईने अभ्यास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी गुन्हे घडलेली ठिकाणे, गुन्ह्याची वेळ आणि आरोपींची कार्यपद्धती यांचा सखोल आढावा घेतला. एकाच प्रकारच्या कार्यपद्धतीने करण्यात आलेल्या काही घरफोडीच्या घटनांची माहिती एकत्रित करून त्याचे तांत्रिक विश्लेषण करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले होते.
पोलिसांनी गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय करण्याबरोबरच घटनास्थळांच्या परिसरातील रस्त्यांवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. उपलब्ध फुटेजमधून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे घरफोडी करणारा संशयित आरोपी अमरावती जिल्ह्यातील आचलपूर तालुक्यातील कविठा येथे आपल्या बहिणीकडे राहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदारांनी कविठा परिसरात जाऊन सापळा रचला. यावेळी दीपक भिमराव दांडगे (वय २५, रा. घुगणी, ता. भैसदेही, जि. बैतूल, मध्यप्रदेश; सध्या रा. कविठा, ता. आचलपूर, जि. अमरावती) याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
पोलिसी चौकशीत दीपक दांडगे याने शिक्रापूर आणि शिरूर परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी करण्यात आली असता, शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक ६६९/२०२६ आणि ६७०/२०२६ तसेच शिरूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक ७०८/२०२६ या तीन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली.
या प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३) आणि ३०५(ए) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपीला पुढील तपासासाठी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ६६९/२०२६ मध्ये अटक करण्यात आली आहे.
तपासादरम्यान आरोपीकडून चोरी केलेले सुमारे १६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकलही पोलिसांनी हस्तगत केली आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत २४ लाख ३० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून, तो सध्या शिरूर पोलीस कोठडी रिमांडमध्ये आहे. आरोपीकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, तसेच शिरूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भासले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, संजय पड्याळ, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, विकास पाटील, सागर धुमाळ तसेच शिक्रापूर पोलीस ठाण्यातील उमाकांत कुंजीर, धनंजय थेऊरकर, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, रोहिदास पारखे, अमोल नलगे, मच्छिंद्र काशयप आणि अस्मिता जोंधळे यांनी सहभाग घेतला.
या घरफोडी प्रकरणांचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.






