महाराष्ट्राच्या कुस्तीची समृद्ध परंपरा नव्या पिढीने पुढे नेण्याची गरज* मा नंदकुमार निकम . . *चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेचा थरार*

*महाराष्ट्राच्या कुस्तीची समृद्ध परंपरा नव्या पिढीने पुढे नेण्याची गरज* मा नंदकुमार निकम . . *चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेचा थरार*

 

चार विभागांतील १६० मल्लांचा सहभाग; महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांची उपस्थिती

 

शिरूर, दि. २८ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती आणि शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांच्या आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाच्या जिमखाना विभागात करण्यात आले. पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहिल्यानगर आणि नाशिक या चार विभागांतील तब्बल १६० मल्लांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.

स्पर्धेचे उद्घाटन शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. श्री. नंदकुमार निकम यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते होते.

 

उद्घाटनप्रसंगी बोलताना नंदकुमार निकम यांनी महाराष्ट्राच्या कुस्तीला समृद्ध परंपरा लाभली असून, ही परंपरा नव्या पिढीने पुढे नेण्याची गरज असल्याचे सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची क्रीडा क्षेत्रातील यशस्वी परंपरा कायम राखण्याचे आवाहन त्यांनी खेळाडूंना केले. पंचांनी निष्पक्षपणे निर्णय देत स्पर्धेची गुणवत्ता आणि विश्वासार्हता कायम ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. नवोदित खेळाडूंनी अनुभवी मल्लांकडून मार्गदर्शन घेत आपल्या कौशल्यात सातत्याने सुधारणा करावी, असेही त्यांनी नमूद केले.

 

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी महाविद्यालयाच्या विविध क्षेत्रांतील उपक्रमांचा व कामगिरीचा आढावा घेतला. कुस्ती हा शिस्त, संयम, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावावर आधारित खेळ असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील मल्लांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली असून देशाचे नाव उज्वल केले आहे असे सांगितले. आज होणाऱ्या स्पर्धेमध्ये सर्व खेळाडूंनी खिलाडूवृत्तीने सहभागी होऊन आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच महाविद्यालयाने स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सुविधांचा वापर करताना काही कमतरता जाणवल्यास त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे सहायक क्रीडा संचालक डॉ. सुदाम शेळके यांनी स्पर्धेचे नियम व अटी स्पष्ट करून खेळाडूंना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभागाचे समन्वयक डॉ. डी. एच. बोबडे यांनी केले व त्यामध्ये त्यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका मांडली व सर्व उपस्थितांचे स्वागत केले.

 

या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक डॉ. संतोष भुजबळ, आंतरराष्ट्रीय पंच श्री. दिनेश गुंड, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एच. एस. जाधव, विज्ञान विभागप्रमुख प्रो. डॉ. घनगावकर, प्रा. गणेश गव्हाणे, प्राध्यापक, शिक्षक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, निमंत्रित समिती सदस्य, मार्गदर्शक तसेच विविध महाविद्यालयांतील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मंजुषा पाटील यांनी केले. शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. आप्पासाहेब चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *