घोडनदीच्या किनारी गावठी हातभट्टीवर शिरूर पोलिसांचा छापा
निमोणे येथील कारवाईत ४१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; संशयित दाम्पत्य पोलिसांची चाहूल लागताच पसार
– बालाजी कांबळे शिरूर : प्रतिनिधी
शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमोणे गाव परिसरात घोडनदीच्या किनारी उसाच्या शेताच्या बांधावर सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी हातभट्टीवर शिरूर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन, तयार दारू, केमिकलयुक्त ताडी तसेच हातभट्टीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ४१ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले यांना निमोणे परिसरात घोडनदीच्या किनारी गावठी हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी काही व्यक्ती गावठी दारूसाठी कच्चे रसायन तयार करीत असून, तयार हातभट्टीची दारू व केमिकलयुक्त ताडी विक्रीसाठी ठेवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने पथक व पंचांसह घटनास्थळी धाव घेतली.
पोलिस पथक घटनास्थळी पोहोचताच पप्पू उर्फ सुभाष कोंडीभाऊ गव्हाणे व त्यांची पत्नी यांनी पोलिसांची चाहूल लागताच शेजारील उसाच्या शेतात पळ काढल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोघेही निमोणे, ता. शिरूर, जि. पुणे येथील रहिवासी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मोठ्या प्रमाणात कच्चे रसायन जप्त
कारवाईदरम्यान दोन निळ्या रंगांच्या ड्रममध्ये असलेले सुमारे २०० लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन, तसेच लोखंडी बॅरलमध्ये असलेले आणखी २०० लिटर कच्चे रसायन पोलिसांनी जप्त केले. याशिवाय हातभट्टीसाठी वापरण्यात येणारे लोखंडी ड्रमवरील अॅल्युमिनियमचे घमेले, पाच लिटर गावठी हातभट्टीची दारू, पाच लिटर केमिकलयुक्त ताडी आणि अॅल्युमिनियमचा चाटू असा मुद्देमालही पोलिसांच्या हाती लागला.
जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ४१ हजार ६०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९७०/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार झालेल्या संशयितांचा शोध घेण्यासह या हातभट्टीच्या माध्यमातून बेकायदेशीर दारू निर्मिती व विक्रीचे जाळे कितपत पसरले आहे, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
या कारवाईत फिर्याद पोलीस अंमलदार अमोल शंभुदेव माने (ब.नं. ३७०) यांनी दिली. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार उबाळे (ब.नं. १८९८) यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार टेंगले (ब.नं. २४९९) करीत आहेत.
शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात कारवाई सुरू असून, अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560





