जुन्नर तालुक्यातील घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; ३८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

जुन्नर तालुक्यातील घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; ३८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

 

सह्याद्रीचा आवाज -योगेश राऊत

 

जुन्नर तालुक्यातील ओतूर व नारायणगाव परिसरात रात्रीच्या वेळी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि ओतूर पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी आरोपींकडून १९ तोळे सोन्याचे दागिने, २ किलो ७७० ग्रॅम चांदी, दोन लाख रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ३८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे आरोपींचा माग काढताना पोलिसांनी ओतूरपासून नाशिकपर्यंत तब्बल १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून संशयित वाहनाचा माग काढला. तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे नाशिकमधील वडाळा, इंदिरानगर आणि लासलगाव परिसरात सापळा रचून वसीम मुनीर पठाण, अदनान युनूस पठाण आणि सोनू उर्फ मोहम्मद शरीफ रसूल शेख या तिघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींचा संबंधित घरफोड्यांमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हे करताना पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच परस्पर संपर्क साधण्यासाठी आरोपी वायरलेस वॉकी-टॉकीचा वापर करीत असल्याचेही तपासात समोर आले. चोरीची चांदी खरेदी केल्याच्या आरोपावरून सागर अशोक शिंदे यालाही पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे ओतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन आणि नारायणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अशा एकूण चार घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून, या टोळीने आणखी कुठे घरफोड्या केल्या आहेत का, याचा तपास सुरू आहे. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास ओतूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक युवराज जाधव करीत आहेत.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *