काकासाहेब थोरातांच्या शताब्दी जयंतीनिमित्त विचारांचा जागर; बोरी पारधीत मान्यवरांची मांदियाळी
प्रा. गणेश शिंदे यांच्या व्याख्यानाची विशेष पर्वणी; सहकार क्षेत्रातील योगदानाला अभिवादन
बोरी पारधी : प्रतिनिधी – विकास साळुंके
सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे सहकार महर्षी स्वर्गीय काकासाहेब थोरात यांच्या शताब्दी जयंतीनिमित्त बोरी पारधी येथे भव्य अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांचे विशेष व्याख्यान होणार असून, सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत स्व. थोरात यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येणार आहे.
इंदिरा राष्ट्रीय कामगार सहकार सोसायटी लि., मुंबई आणि सहकार महर्षी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्यादित, बोरी पारधी यांच्या संयुक्त विद्यमाने दत्त गार्डन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, आमदार राहुल कुल, नरेंद्र पाटील, गुलाबराव जगताप यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे स्व. काकासाहेब थोरात यांच्या शताब्दी जयंतीचा हा सोहळा सहकार क्षेत्रासाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.
स्व. काकासाहेब थोरात यांच्या कार्याची स्मृती पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे, त्यांच्या सहकारविषयक विचारांना उजाळा देणे आणि त्यांच्या कार्याचा गौरव करणे, हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
प्रा. गणेश शिंदे यांच्या विशेष व्याख्यानामुळे कार्यक्रमाला वैचारिक अधिष्ठान मिळणार असून, सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या अभिवादन सभेमुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शताब्दी जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाची परिसरात उत्सुकता असून, नागरिक आणि सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरणार आहे.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560




