मावशी, साप आला!’ म्हणत वृद्धेला पळविले; पाठलाग करून दागिने हिसकावले

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्धेला पळविले; पाठलाग करून दागिने हिसकावले

 

यवत पोलिसांची तत्पर कारवाई; एक आरोपी ताब्यात, दोन साथीदारांचा शोध सुरू

 

प्रतिनिधी – योगेश राऊत 

 

 

शेतात काम करून झाडाखाली बसलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला ‘मावशी, साप आला!’ असे सांगून घाबरवून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पसार झालेल्या तिघांपैकी एका सराईत आरोपीला यवत पोलिसांनी अल्पावधीत जेरबंद केले. सुमित उर्फ घा-या ईश्वर साळुंखे (वय १९, रा. बोरीपार्धी, ता. दौंड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेले सुमारे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे आक्कासाहेब डोरले व काळ्या मण्यांची पोत, तसेच गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन मोटारसायकल असा एकूण सुमारे ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ९ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास दापोडी गावच्या हद्दीतील गट क्रमांक ५९ मधील शेतजमिनीत ही घटना घडली. सुनंदा बापू रूपनवर (वय ६५) या ऊस लागवडीचे काम करून शेतातील झाडाजवळ बसल्या होत्या. त्यावेळी सुमित उर्फ घा-या साळुंखे व त्याचे दोन अनोळखी साथीदार मोटारसायकलवरून तेथे आले.

 

त्यापैकी दोघे सुनंदा रूपनवर यांच्या जवळ गेले. त्यांनी अचानक ‘मावशी, साप आला!’ असे मोठ्याने सांगून त्यांना घाबरवले. साप असल्याचे समजताच वृद्ध महिलेने घाबरून तेथून पळण्यास सुरुवात केली. याच संधीचा फायदा घेत आरोपींनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याचे आक्कासाहेब डोरले व काळ्या मण्यांची पोत जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यानंतर तिन्ही आरोपी मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाले.

 

या घटनेप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८९८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

 

गुन्हा दाखल झाल्यानंतर यवत पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींच्या हालचालींचा माग काढण्यात आला. पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासातून अल्पावधीत आरोपी सुमित उर्फ घा-या साळुंखे याचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.

 

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या चौकशीत गुन्ह्याचा तपास पुढे गेला. त्याच्याकडून चोरीस गेलेले सुमारे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे आक्कासाहेब डोरले व काळ्या मण्यांची पोत, अंदाजे ६५ हजार रुपये किमतीची, तसेच गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन मोटारसायकल, अंदाजे ३० हजार रुपये किमतीची, असा एकूण ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

या गुन्ह्यातील सुमित उर्फ घा-या साळुंखे याला पोलिसांनी जेरबंद केले असून, त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी साथीदारांचा शोध सुरू आहे. या आरोपींची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

 

चोरीस गेलेले दागिने परत मिळाल्याने वृद्ध महिला सुनंदा रूपनवर यांनी यवत पोलिसांचे आभार मानले.

 

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल, बारामती विभागाचे अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार आणि दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर, सहायक पोलिस निरीक्षक आबा गाढवे, पोलिस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक बाळकृष्ण गाडेकर तसेच पोलिस अंमलदार रॉकी देवकाते, संदिप देवकर, अमोल काळे, धिरज जाधव, अमोल भुजबळ, सचिन गुंड, प्रतिक धिवार, प्रतिक जगताप, विकास मोरे, दिनेश लोणकर व विनित कु-हाडे यांच्या पथकाने केली.

 

गुन्ह्याचा पुढील तपास श्रेणी पोलिस उपनिरीक्षक बाळकृष्ण गाडेकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *