भीमा नदीपात्रात आढळलेल्या अनोळखी पुरुषाच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे शिक्रापूर पोलिसांचे आवाहन
Rjnews27 मराठी – रमेश बनसोडे
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा येथील भीमा नदीच्या पात्रात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून, या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. संबंधित व्यक्तीचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असून, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जून २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास टाकळी भीमा, ता. शिरूर, जि. पुणे येथील भीमा नदीच्या पात्रात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला असून, संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मृत व्यक्तीच्या अंगावर लाल रंगाचा हाफ बाह्यांचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट होती. तसेच त्याने काळ्या रंगाचे शॅन्डो बनियन परिधान केलेले होते. या बनियनच्या पाठीमागील बाजूस खिशाजवळ ‘INDIAN ARMY’, तसेच कॉलरवर ‘Shakti Winning Spirit’ असे इंग्रजीत लिहिलेले आहे. याशिवाय मृत व्यक्तीच्या अंगावर निळ्या रंगाचे अंडरवेअर असून त्यावर ‘TT JAZZ’ असे इंग्रजीत लिहिलेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या वर्णनावरून सदर व्यक्ती कोणाच्या परिचयातील असल्यास किंवा गेल्या काही दिवसांत आपल्या परिसरातून वरील वर्णनाशी साधर्म्य असलेली व्यक्ती बेपत्ता असल्यास नागरिकांनी तातडीने शिक्रापूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांकडून मिळणारी माहिती या मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
या प्रकरणी माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असून, योग्य माहिती देणाऱ्यास बक्षीस देण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
अधिक माहितीसाठी शिक्रापूर पोलीस स्टेशन, तसेच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख आणि पोलीस हवालदार गणेश कुडळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



