गुणपत्रिकेवरील खाडाखोडीच्या रागातून ९ वर्षीय मुलीची निर्घृण हत्यादेऊळगाव राजे येथे संतापजनक घटना; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न

गुणपत्रिकेवरील खाडाखोडीच्या रागातून ९ वर्षीय मुलीची निर्घृण हत्यादेऊळगाव राजे येथे संतापजनक घटना; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न

पाटस प्रतिनिधी- योगेश राऊत

शाळेच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड केल्याचा संशय घेऊन व त्याचा राग मनात धरून एका पित्याने स्वतःच्या ९ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी दौंड पोलिसांनी वडिलांसह एका महिलेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत दौंड पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई निलेश आत्माराम फडणीस यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शांताराम दुर्योधन चव्हाण (वय ३३) व चिंगु शिंदबाद भोसले, दोघे रा. हनुमान वस्ती, काळे वस्ती जवळ, देऊळगाव राजे, ता. दौंड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मे रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी शांताराम चव्हाण याची मुलगी अनामिका शांताराम चव्हाण (वय ९) हिने तिचा भाऊ संस्कार याच्या शाळेच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड केल्याचा राग आरोपीच्या मनात होता. या कारणावरून त्याने संतापाच्या भरात मुलगी अनामिकाच्या गळ्यावर, डोक्याच्या मागील भागावर व गालावर लाकूड कापण्याच्या मशीनच्या फिरत्या पात्याने वार करून तिची हत्या केली.

घटना घडल्यानंतर आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मुलीचा मृतदेह कपड्यात गुंडाळून घरात आग लावल्याचा आरोप आहे. मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर आरोपीसोबत राहणारी महिला चिंगु भोसले हिनेही प्रकाराची माहिती कोणालाही सांगू नये, असे सांगून घटना पोलिसांपासून लपवून ठेवल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी दौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक २८२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१), २३८ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल उगले करीत आहेत. तर गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम यांनी केले. या अमानुष घटनेमुळे देऊळगाव राजे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *