मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती; प्रशासनातील अनुभवी नेतृत्वाला संधी

मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती; प्रशासनातील अनुभवी नेतृत्वाला संधी

पाटस प्रतिनिधी – योगेश राऊत

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची नियुक्ती करण्यात आल्याने विविध स्तरांतून या निर्णयाचे स्वागत होत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर भूमिका, प्रशासनातील दीर्घ अनुभव आणि संवेदनशील कार्यशैली यामुळे त्यांच्या नियुक्तीकडे सकारात्मक पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

राज्य महिला आयोग हे महिलांच्या हक्कांचे संरक्षण, तक्रारींचे निवारण, अत्याचारग्रस्त महिलांना न्याय मिळवून देणे आणि शासनाला धोरणात्मक सूचना देणे यासाठी महत्त्वाची संस्था मानली जाते. अशा महत्त्वाच्या पदावर अनुभवी आणि अराजकीय व्यक्तिमत्त्वाची निवड झाल्याने आयोगाच्या कामकाजाला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मीरा बोरवणकर या महाराष्ट्र केडरच्या १९८१ बॅचच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. आपल्या कठोर, धाडसी आणि परिणामकारक कार्यपद्धतीमुळे त्यांनी राज्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. गुन्हेगारीविरोधातील कारवाया, तपासातील शिस्तबद्धता आणि महिलांच्या सुरक्षेबाबत घेतलेली ठाम भूमिका यामुळे त्यांना ‘लेडी सुपरकॉप’ अशी ओळख मिळाली.

त्यांच्या कारकिर्दीत अनेक संवेदनशील आणि गाजलेल्या प्रकरणांचा तपास त्यांनी प्रभावीपणे हाताळला. पोलिस दलातील प्रशासनिक शिस्त, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठीची तत्परता आणि जनतेशी संवाद साधण्याची शैली यामुळे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये वेगळे स्थान निर्माण केले होते. महिलांवरील अत्याचार, लैंगिक गुन्हे आणि सामाजिक सुरक्षेशी संबंधित विषयांबाबत त्यांनी वेळोवेळी संवेदनशील दृष्टिकोन मांडला होता.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी निवृत्त महिला न्यायाधीश हा अधिक योग्य पर्याय मानला जाऊ शकतो, अशी चर्चाही काही स्तरांतून होत असते. मात्र, केवळ राजकीय पार्श्वभूमीच्या नियुक्त्यांपेक्षा कायदा-सुव्यवस्था, प्रशासन आणि जनसंपर्काचा मोठा अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांची निवड अधिक प्रभावी ठरू शकते, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

महिला आयोगासमोर सध्या महिलांवरील वाढते अत्याचार, सायबर गुन्हे, कौटुंबिक हिंसाचार, कार्यस्थळी होणारा छळ आणि सामाजिक भेदभाव यांसारखी अनेक आव्हाने आहेत. या पार्श्वभूमीवर बोरवणकर यांच्या अनुभवाचा आयोगाच्या कामकाजात सकारात्मक उपयोग होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *