सशक्त पोलिस दलासाठी आरोग्याचा संकल्प; रांजणगाव पोलिसांचे आदर्श पाऊल

रांजणगाव पोलिसांकडून आरोग्य तपासणी शिबिर; महिला कर्मचाऱ्यांच्या समस्यांवरही विशेष भर
शिरूर (वार्ताहर)


पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि त्यांच्या तणावपूर्ण कामकाजातून उद्भवणाऱ्या आजारांना वेळेवर आळा घालता यावा, या उद्देशाने रांजणगाव पोलिस स्टेशन येथे विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिरूर उपविभाग, पुणे ग्रामीण यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला पोलिस कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दि. 01 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी (SDPO) श्री. प्रशांत ढोले प्रमुख उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी पोलिस दलातील कामकाज अत्यंत तणावपूर्ण व वेळेच्या बंधनात अडकलेले असल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगितले. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी ही प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या शिबिरात साईदीप हॉस्पिटल, अहिल्यानगर येथील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम – डॉ. अनिकेत कुऱ्हाडे, डॉ. स्मिता वाघमोडे, डॉ. कस्तुरी कुऱ्हाडे – यांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल आरोग्य तपासणी केली. रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, तसेच इतर जीवनशैलीशी संबंधित आजारांची तपासणी करून आवश्यक ते वैद्यकीय सल्ले देण्यात आले.
विशेष म्हणजे, महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी निगडित समस्यांकडेही या शिबिरात विशेष लक्ष देण्यात आले. अनियमित कामाचे तास, वेळेवर आहार न घेणे, सततची धावपळ आणि मानसिक तणाव यामुळे महिलांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्यांना योग्य मार्गदर्शन केले. आरोग्यदायी जीवनशैली, संतुलित आहार आणि नियमित तपासणी यांचे महत्त्व यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या प्रसंगी पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे व पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे नियोजन व अंमलबजावणी सुरळीत पार पडली.
या उपक्रमामुळे पोलिस दलातील कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून, आवश्यक वैद्यकीय तपासणीची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *