पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील लिंगाळी आणि मलठण परिसरात वाद, मारहाण व खंडणी मागणीच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मलठण येथील शेतकरी भिमराव विठोबा पांढरे (वय 42) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते दुचाकीवरून दौंडहून मलठणकडे जात असताना लिंगाळी ग्रामपंचायतसमोरील रस्त्यावर त्यांना अक्षय आटोळे (रा. रावणगाव) याने फोनवर शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर घटनास्थळी येऊन चारचाकी वाहन अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तसेच रस्त्यावरचा दगड उचलून डोक्यात मारहाण केल्याचा आणि हाताने-लाथाबुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, याच घटनेबाबत दुसऱ्या बाजूनेही तक्रार दाखल झाली आहे. रावणगाव येथील अक्षय पांडुरंग आटोळे (वय 30), जे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरी करतात, यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भिमराव पांढरे यांनी कर्ज अर्जातील त्रुटीच्या कारणावरून आधीही बँकेत येऊन व फोनवरून शिवीगाळ केली होती. त्यानंतर लिंगाळी ग्रामपंचायतसमोरील रस्त्यावर भेट झाल्यानंतर त्यांनी दगडाने डोक्यात मारहाण केली व हाताने-लाथाबुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या दोन्ही तक्रारींवरून पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.
दरम्यान, दुसऱ्या एका प्रकरणात इनामगाव (ता. शिरूर) येथील शेतकरी राहुल भानुदास गांधले (वय 37) यांनी मलठण येथील शेतजमिनीवर काम करत असताना गौरव नामदेव आवचर (रा. मलठण) याने फोन करून तसेच प्रत्यक्ष येऊन दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार केली आहे. शेतातील काम सुरू ठेवायचे असल्यास पैसे देण्याची मागणी करत अन्यथा जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर शेतातील काम बंद करून संबंधित व्यक्ती तेथून निघून गेल्याचेही सांगण्यात आले आहे.
या तिन्ही प्रकरणांची नोंद दौंड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिस कर्मचारी संतोष शिंदे यांनी गुन्हे दाखल केले आहेत. संबंधित घटनांचा पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत.





