अहिल्यानगर–बीडमध्ये आभाळ फाटले! पावसाने कहर, लष्कराच्या मदतीने बचावकार्य सुरू

अहिल्यानगर–बीडमध्ये आभाळ फाटले! पावसाने कहर, लष्कराच्या मदतीने बचावकार्य सुरू

अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यांत मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेक गावांना पुराचा वेढा बसला असून, बचावासाठी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पुरात अडकलेल्या गावकऱ्यांना एअरलिफ्ट करून सुरक्षित स्थळी हलवले जात आहे.

बीडमध्ये पूरस्थिती गंभीर

आष्टी तालुक्यातील कडी नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे गावात पाणी शिरले आहे. अनेक कुटुंबे घरात अडकून पडली असून, नागरिकांनी इमारतींवर चढून मदतीची आर्त हाक दिली. या भीषण परिस्थितीत लष्कराचे पथक तातडीने दाखल झाले. हेलिकॉप्टर व जेसीबीच्या साहाय्याने नागरिकांना वाचवण्याचे काम सुरू आहे. पुराच्या पाण्यात अनेक जनावरे वाहून गेली असून, शेतमालाचे व शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

अहिल्यानगरमध्ये ढगफुटीसारखा पाऊस

पाथर्डी तालुक्यातील करंजी, जवखेडे, तिसगाव, मढी परिसरात ढगफुटीसारखा पाऊस झाला. पुलांवरून पाणी वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. वाड्या-वस्त्यांना पुराचा वेढा बसला असून, करंजी व जवखेडे या गावांत परिस्थिती गंभीर बनली आहे. या दोन्ही गावांतील सुमारे 70 ते 80 नागरिक पुरात अडकले होते. त्यापैकी करंजी गावातील 16 जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

प्रशासन व बचावपथक सज्ज

पूरग्रस्त भागात जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथके, तसेच लष्कराचे जवान बचावकार्य करत आहेत. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात असून, अन्न व औषधांची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम राबवली आहे.

मुसळधार पावसामुळे जीवितहानी टाळली असली, तरीही मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन हवेहवेते प्रयत्न करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *