यवतमध्ये महिलेच्या घरासमोर अघोरी वस्तू ठेवून दहशत; साडी ओढून विनयभंगाचा प्रयत्न, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

यवतमध्ये महिलेच्या घरासमोर अघोरी वस्तू ठेवून दहशत; साडी ओढून विनयभंगाचा प्रयत्न, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Rjnews27 मराठी -विकास साळुंके

यवत : महिलेच्या घराच्या दरवाजाबाहेर अघोरी कृत्य किंवा जादूटोणा करण्याच्या उद्देशाने कुंकू लावलेला दगड, पांढरे अंडे, टाचण्या टोचलेली काळी बाहुली, लिंबू तसेच लाल रंगाची पुडी असलेला बॉक्स ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार यवत येथे समोर आला आहे. या प्रकारानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्याचवेळी संबंधित महिलेच्या घराच्या दरवाजावर जोरजोरात लाथा मारून तिला घराबाहेर ओढत तिची साडी ओढून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचीही तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

 

याप्रकरणी संगीता रामदास महाडीक (वय ४८, व्यवसाय नोकरी) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अरुण रामभाऊ दोरगे, रा. आनंदग्राम सोसायटी, यवत, ता. दौंड, जि. पुणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास तसेच १२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.४५ वाजण्याच्या सुमारास यवत गावच्या हद्दीत, फिर्यादी राहत असलेल्या घरासमोर हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजाबाहेर एका बॉक्समध्ये कुंकू लावलेला दगड, पांढरे अंडे, टाचण्या टोचलेली काळी बाहुली, लिंबू आणि लाल रंगाची पुडी ठेवलेली आढळून आली. या वस्तू अघोरी कृत्य अथवा जादूटोणा करण्याच्या उद्देशाने ठेवण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

 

दरम्यान, आरोपीने फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजावर जोरजोराने लाथा मारल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. आवाज ऐकून फिर्यादीने दरवाजा उघडला असता आरोपीने त्यांना घराबाहेर ओढून घेतले. फिर्यादीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांची साडी ओढून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोप आहे.

 

यानंतर आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करत, “सकाळपासून पोलीस चौकीला तक्रार द्यायला जात आहेस, माझी काय कुणी उपटली का?” अशा शब्दांत मोठमोठ्याने ओरडून धमकावल्याचे तक्रारीत नमूद आहे. या गोंधळाचा आवाज ऐकून फिर्यादीचे पती आणि दोन्ही मुले घराबाहेर आले. त्यावेळी आरोपी तेथून पळून गेल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले.

 

या घटनेमुळे संबंधित कुटुंबासह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. अघोरी प्रथा व जादूटोण्यास प्रतिबंध करण्याच्या महाराष्ट्रातील कायद्यानुसार तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित तरतुदींनुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

यवत पोलीस ठाण्यात १२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १०.३५ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Verified by MonsterInsights