‘एक मुठ्ठी अनाज’मधून संस्कार स्कूलचा माणुसकीचा संदेश

Rjnews 27 मराठी – विकास साळुंके 

विद्यार्थ्यांनी गरजू मुलांसाठी केले धान्यसंकलन; सामाजिक बांधिलकीची शिकवण कृतीत उतरवली

 

दौंड : शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, संवेदनशीलता आणि माणुसकीची भावना रुजविणे हा त्याचा खरा उद्देश आहे. याच विचारातून संस्कार प्रायमरी अ‍ॅण्ड हायस्कूल, दौंडच्या विद्यार्थ्यांच्या वतीने सोमवार, दि. २४ ऑगस्ट आणि मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी ‘एक मुठ्ठी अनाज’ हा सामाजिक उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आला.

 

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे धान्याचे संकलन करून दौंड परिसरातील गरजू व विशेष मुलांसाठी मदतीचा हात पुढे केला. संकलित धान्याचे वाटप स्व. सुभाष आण्णा कुल मतिमंद व बहुविकलांग मुलांची शाळा, पासलकर वस्ती, दौंड तसेच सद्गुरू साईबाबा आश्रमशाळा, गिरीम, दौंड येथे करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे संबंधित संस्थांमधील मुलांना आधार मिळण्याबरोबरच दातृत्वाची आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधोरेखित झाली.

 

इयत्ता ६ वीच्या अभ्यासक्रमातील सामाजिक बांधिलकी, सहकार्य आणि संवेदनशीलता या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या या प्रयत्नांना नर्सरी ते इयत्ता १० वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी आपल्या परीने धान्य उपलब्ध करून देत या उपक्रमाला व्यापक स्वरूप दिले.

 

‘एक मुठ्ठी अनाज’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सामाजिक मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. गरजू व्यक्तींना मदत करणे, उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे आणि समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखणे, याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. त्यामुळे सहकार्य, दातृत्व, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांचा सुंदर संगम या उपक्रमातून घडून आला.

 

विशेष म्हणजे, पुस्तकांमध्ये सामाजिक बांधिलकीविषयी शिकविले जाणारे धडे प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे काम या उपक्रमातून झाले. विद्यार्थ्यांनी केवळ धान्याचे संकलन केले नाही, तर ‘आपल्याकडील थोडेसे इतरांच्या उपयोगी पडू शकते’ हा माणुसकीचा संदेशही समाजापर्यंत पोहोचविला.

 

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संस्थापक मा. श्री. जयंत पवार सर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. प्रतिभा पवार मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सौ. प्रीती गंगावणे यांनी केली. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत उपक्रम यशस्वी केला.

 

‘शिक्षणातून संस्कार आणि संस्कारातून माणुसकी’ हा विचार प्रत्यक्ष कृतीतून रुजविणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणीव निर्माण करण्याबरोबरच गरजू घटकांना मदतीचा हात देण्याची प्रेरणा देणारा ‘एक मुठ्ठी अनाज’ हा उपक्रम संस्कार स्कूलच्या शैक्षणिक वाटचालीतील सामाजिक बांधिलकीचे प्रभावी उदाहरण ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *