रामलिंग येथे बंद घराचे कुलूप तोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपास
Rjnews27 मराठी – रमेश बनसोडे
शिरूर : शिरूर तालुक्यातील रामलिंग येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ८५ हजार ५० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगाधर रामचंद्र भोसले (वय ६९, रा. रामलिंग, ता. शिरूर, जि. पुणे; सध्या रा. सायन, मुंबई) यांनी याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजल्यापासून २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घरफोडी झाल्याचा संशय आहे.
भोसले यांचे रामलिंग येथील घर बंद असताना अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप व कडी-कोंडे तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममध्ये असलेल्या लोखंडी कपाटाचा दरवाजा तोडण्यात आला. कपाटातील तिजोरीचा कप्पाही फोडून त्यामध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्याने लंपास केली.
चोरीस गेलेल्या ऐवजात सुमारे २ लाख ३० हजार रुपये किमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे तीन पदरी गरसुळ, प्रत्येकी ५ ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे मोठे मणी असलेले मंगळसूत्र, २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लहान मंगळसूत्र, १ ग्रॅम वजनाचे सोन्याचे एक मण्याचे लहान मंगळसूत्र, ३ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या सात पुतळ्या, २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले तसेच प्रत्येकी १ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या नथा यांचा समावेश आहे.
याशिवाय ५ ग्रॅम वजनाचा चांदीचा पाळणा, ७ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुका, २१ ग्रॅम वजनाचे चांदीचे २१ गोळे आणि ३ हजार ६०० रुपये रोख रक्कमही चोरीस गेली आहे. चोरीस गेलेल्या मालाची एकूण किंमत ४ लाख ८५ हजार ५० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घर बंद असल्याची संधी साधून चोरट्याने घरफोडी केल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्याचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सहाय्यक फौजदार भोते यांनी केली आहे.
हा गुन्हा शिरूर पोलीस ठाणे गु.र.नं. ७७२/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(२), ३०५ अन्वये दाखल करण्यात आला आहे.




