पुण्यात नव्या चारचाकी वाहनांसाठी आता MH-61 मालिका; MH-12 नंतर नवी ओळख

पुण्यात नव्या चारचाकी वाहनांसाठी आता MH-61 मालिका; MH-12 नंतर नवी ओळख

Rjnews 27 मराठी – रमेश बनसोडे 

पुणे : पुणेकरांच्या वाहनांवर गेल्या अनेक वर्षांपासून ठळकपणे दिसणाऱ्या ‘MH-12’ क्रमांकाला आता नव्या मालिकेची जोड मिळणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) चारचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी ‘MH-61’ या नवीन मालिकेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे नव्याने नोंदणी होणाऱ्या चारचाकी वाहनांना आता MH-61 A 0001 या स्वरूपातील क्रमांक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

पुणे आरटीओमधील सध्याच्या MH-12 मालिकेतील उपलब्ध क्रमांक जवळपास संपुष्टात आल्याने पुढील नोंदणीसाठी पर्यायी मालिकेची आवश्यकता निर्माण झाली होती. पुण्यात दरवर्षी मोठ्या संख्येने नव्या वाहनांची विक्री होत असल्याने वाहन नोंदणीचा वाढता ताण लक्षात घेऊन परिवहन विभागाने नवीन मालिकेचा पर्याय स्वीकारला आहे.

 

नवीन मालिकेच्या प्रारंभी पसंतीच्या क्रमांकांसाठी वाहनधारकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरटीओकडून आगाऊ अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. विशेष क्रमांक मिळवू इच्छिणाऱ्या वाहनधारकांसाठी नियमानुसार लिलावाची प्रक्रियाही करण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी आरटीओ कार्यालयात होणारी गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

 

दरम्यान, ‘MH-12’ ही मालिका पुण्याच्या वाहनांची एक वेगळी ओळख बनली आहे. दुचाकी वाहनांच्या नोंदणीमध्ये ही मालिका MH-12 ZZ पर्यंत पोहोचली आहे. विद्यमान नोंदणी पद्धतीनुसार दोन अक्षरांच्या मालिकेनंतर थेट तीन अक्षरांची मालिका सुरू करण्याची तरतूद नसल्याने पुण्यासाठी नवीन क्रमांक मालिकेचा पर्याय शोधण्यात आला.

 

पुण्याची ‘MH-12’ ही ओळख कायम ठेवण्यासाठी ‘MH-12 1A’ अशा पर्यायी स्वरूपाचा प्रस्तावही चर्चेत आला होता. यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात आला. मात्र, प्रशासकीयदृष्ट्या नवीन मालिका सुरू करणे तुलनेने सुलभ असल्याने अखेर ‘MH-61’ला पसंती देण्यात आली.

 

राज्यातील वाहन नोंदणी व्यवस्थेत प्रत्येक प्रादेशिक परिवहन कार्यालयाला स्वतंत्र ‘MH’ कोड आणि त्यानुसार क्रमांक मालिका देण्यात येते. वाहनांची संख्या वाढत गेल्याने उपलब्ध क्रमांक संपल्यानंतर नव्या मालिकांचा वापर केला जातो. त्याच प्रक्रियेत MH-60 नंतर पुण्यासाठी MH-61 ही मालिका निश्चित करण्यात आली आहे.

 

त्यामुळे पुण्याच्या वाहनविश्वात आता एक नवा बदल दिसणार आहे. जुन्या वाहनांवरील ‘MH-12’ ही पुण्याची पारंपरिक ओळख कायम राहणार असली, तरी आगामी काळात रस्त्यावर धावणाऱ्या नव्या चारचाकी वाहनांच्या क्रमांकपट्ट्यांवर ‘MH-61’ हा नवा क्रमांकही तितक्याच ठळकपणे दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *