विठ्ठलवाडीतील प्रयोगशील शेतकरी मधुकर दोरगे यांच्या ऊस शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोगाचे आमदार अशोक पवार यांच्याकडून कौतुक

विठ्ठलवाडीतील प्रयोगशील शेतकरी मधुकर दोरगे यांच्या ऊस शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोगाचे आमदार अशोक पवार यांच्याकडून कौतुक

 

ऊस पीक परिसंवादात रोग-किडी, खत व्यवस्थापन व शाश्वत ऊस उत्पादनाबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

 

शिरूर प्रतिनिधी : विजय कांबळे

 

विठ्ठलवाडी येथील प्रयोगशील शेतकरी श्री. मधुकर शंकरराव दोरगे यांच्या ऊस शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोगाची शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक बापू पवार यांनी पाहणी करून कौतुक केले. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शाश्वत व भरघोस ऊस उत्पादन घेण्याच्या दृष्टीने ठिबक सिंचन, योग्य खत व्यवस्थापन तसेच रोग-किडींचे प्रभावी नियंत्रण करणे गरजेचे असल्याचे आमदार पवार यांनी यावेळी सांगितले.

 

शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी FMC इंडिया, वेंकटेश कृपा शुगर मिल लिमिटेड कारखाना आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठलवाडी येथे ऊस पीक पाहणी व ऊस पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आमदार अशोक बापू पवार, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे डॉ. तुषार शितोळे, डॉ. प्रीती देशमुख, FMC इंडियाचे झोनल मार्केटिंग मॅनेजर प्रशांत बोराडे, झोनल बिझनेस मॅनेजर संदीप शिन, ए.एम.एम. सुदाम मोरे, टी.एम. सुधीर गरड यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात ऊस पीक पाहणीने झाली. यावेळी श्री. मधुकर शंकरराव दोरगे यांच्या ऊस शेतीमध्ये करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांची मान्यवरांनी पाहणी केली. आमदार अशोक पवार यांनी दोरगे यांच्या प्रयोगशीलतेचे कौतुक करत शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालणे आवश्यक असल्याचे सांगितले. पाण्याचा कार्यक्षम वापर, उत्पादन खर्चात बचत आणि पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी ठिबक सिंचनाचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

 

ऊस पीक पाहणीनंतर आयोजित परिसंवादात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे डॉ. तुषार शितोळे यांनी ऊस पिकावर येणाऱ्या विविध रोग व किडींबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. रोग-किडींची लक्षणे वेळीच ओळखून योग्य वेळी उपाययोजना केल्यास पिकाचे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते, याबाबत त्यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली.

 

डॉ. प्रीती देशमुख यांनी ऊस पिकातील खत व्यवस्थापनावर मार्गदर्शन करताना जमिनीची गरज, पिकाची अवस्था आणि उपलब्ध अन्नद्रव्यांचा विचार करून खतांचा संतुलित वापर करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. अतिरिक्त रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीच्या सुपीकतेवर तसेच शेतीच्या दीर्घकालीन उत्पादकतेवर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देत शेतकऱ्यांनी गरजेनुसार व शास्त्रीय पद्धतीने खतांचा वापर करावा, असे त्यांनी सांगितले.

 

FMC इंडियाचे झोनल मार्केटिंग मॅनेजर प्रशांत बोराडे यांनी ऊस पिकासाठी FMC इंडियाच्या विविध उत्पादनांची माहिती देत त्यांच्या योग्य वापराबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पिकाचे आरोग्य, रोग-किडींचे व्यवस्थापन आणि उत्पादनाची गुणवत्ता यासाठी योग्य नियोजनाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रयोगशील शेतकरी श्री. मधुकर शंकरराव दोरगे यांचा सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना दोरगे यांनी आपल्या ऊस शेतीतील प्रयोगांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. शाश्वत व भरघोस ऊस उत्पादन मिळविण्यासाठी त्यांनी FMC इंडियाची उत्पादने आपल्या शेतीमध्ये कोणत्या पद्धतीने वापरली, तसेच त्यातून मिळालेल्या अनुभवांची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी मांडली.

 

शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादामुळे ऊस पिकातील रोग-किडींचे नियंत्रण, खत व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शाश्वत उत्पादन पद्धती याबाबत प्रत्यक्ष तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा कार्यक्रम उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरला.

 

संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन FMC इंडियाचे टी.एम. सुधीर गरड यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सुरुची भोजनाने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *