मांडवगण फराटा येथे खासदार निलेश लंके यांची भव्य पेढे तुला; वाघेश्वर मंदिरात भक्तिमय वातावरणात सन्मान

 

मांडवगण फराटा | प्रतिनिधी : अल्लाउद्दीन अलवी

 

मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील श्री क्षेत्र वाघेश्वर मंदिरात अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा लोकनेते निलेश लंके यांच्या सदिच्छा भेटीनिमित्त ग्रामस्थ व कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य पेढे तुला कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी ग्रामस्थांनी खासदार लंके यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी ग्रामदैवत श्री वाघेश्वर महाराजांच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली.

 

काही दिवसांपूर्वी खासदार निलेश लंके आजारी असताना राजीव फराटे पाटील आणि डॉ. महेश जाधव यांनी मांडवगण फराटा येथील जागृत देवस्थान श्री वाघेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करून त्यांना लवकर आरोग्य लाभावे, अशी मनोकामना केली होती. या प्रार्थनेनंतर खासदार लंके यांनी मांडवगण फराटा येथे भेट दिल्याने सदर मनोकामना पूर्ण झाल्याच्या भावनेतून पेढे तुला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

खासदार निलेश लंके यांचे मांडवगण फराटा येथे आगमन होताच ग्रामस्थ, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर तसेच घोषणाबाजी करत उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खासदार लंके यांच्याप्रती असलेला स्नेह आणि आपुलकी व्यक्त केली.

 

पेढे तुला ठरली कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण

 

खासदार निलेश लंके यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेली भव्य पेढे तुला हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पेढ्यांची तुला करून खासदार लंके यांचा सन्मान केला. यावेळी उपस्थितांनी त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेच्या कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

 

खासदार निलेश लंके यांच्या सर्वसामान्य जनतेशी असलेल्या आपुलकीच्या नात्याबद्दल तसेच त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल उपस्थित ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या भेटीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

 

जनतेचा विश्वास हीच माझी खरी ताकद” — खासदार निलेश लंके

 

यावेळी बोलताना खासदार निलेश लंके यांनी मांडवगण फराटा व परिसरातील नागरिकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. “जनतेने दाखविलेला विश्वास हीच आपली खरी ताकद आहे,” असे त्यांनी सांगितले.

 

सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे खासदार लंके यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील विकासकामांना विशेष प्राधान्य देतानाच शेतकरी, युवक आणि महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

तसेच शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार लंके यांनी ग्रामस्थांशी मनमोकळेपणाने संवाद साधत त्यांच्या विविध अडचणी व समस्या जाणून घेतल्या. मांडवगण फराटा येथील ग्रामस्थांनी दिलेल्या प्रेमाने आणि आपुलकीने आपण भारावून गेलो असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

 

मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती

 

या कार्यक्रमाला श्री वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजीव फराटे पाटील, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर फराटे पाटील, वाघेश्वर डेअरीचे चेअरमन शरदचंद्र फराटे पाटील, मांडवगण फराटा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन गोविंद तात्या फराटे, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय आबा फराटे, शंकरराव फराटे, आदर्श पोलीस पाटील बाबापाटील फराटे, पंचायत समितीचे माजी सदस्य लक्ष्मणबापू फराटे, राजेंद्र गदादे, संतोष नागवडे, मांडवगण फराटा सहकारी सोसायटीचे संचालक आत्माराम बापू फराटे, संचालक खंडेराव फराटे, माजी सरपंच माणिकआण्णा फराटे, पंडितबाप्पा फराटे, सुभाषपाटील फराटे, डॉ. महेश जाधव, महादेव फराटे, बाभूळसर गावच्या सरपंच दिपाली नागवडे, महेंद्र नागवडे, सोसायटीचे चेअरमन पंडितदादा फराटे, व्हा. चेअरमन उमाकांत कुंभार, माजी सरपंच लतिकाताई जगताप, माजी उपसरपंच अमोल शितोळे, ग्रामपंचायत सदस्य सागरनाना फराटे, किसान सेल अध्यक्ष पुणे जिल्हा सचिन मचाले, सोसायटीचे माजी संचालक कैलास तात्या फराटे, कावीळ तज्ञ डॉ. धनंजय शिंदे, वडगाव रासाईचे सरपंच सचिन शेलार, माजी चेअरमन दूध संस्था दिगंबर फराटे, अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक योगीराज गाडे, हातवळणचे सरपंच योगेश फडके, उपसरपंच भाऊसाहेब कोळपे, सोसायटीच्या संचालिका व माजी सरपंच सीमाताई फराटे, सोसायटीच्या संचालिका रुपालीताई फराटे, माजी उपसरपंच संजय फराटे, युवा उद्योजक गणेश साळुखे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

श्री क्षेत्र वाघेश्वर मंदिर परिसरात झालेल्या या भव्य कार्यक्रमामुळे मांडवगण फराटा परिसरात दिवसभर उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण होते. ग्रामस्थांनी धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक आपुलकीच्या भावनेतून केलेला हा सन्मान कार्यक्रम उपस्थितांच्या चर्चेचा विषय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *