पाटस टोलनाक्यावर भरधाव वाहनांची धडक; टोल गेटचे नुकसान
प्रतिनिधी – विकास साळुंके
यवत : दौंड तालुक्यातील मौजे पाटस येथील पुणे–सोलापूर मार्गावरील पाटस टोलनाक्यावर दोन वाहनचालकांनी निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहने चालवत टोल गेटवरील यंत्रणेला धडक देऊन नुकसान केल्याची घटना २२ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ९.५५ वाजण्याच्या सुमारास पाटस टोलनाका येथे सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील लेन क्रमांक ४ व ५ मध्ये टोल नाक्यावरील कर्मचारी आपापल्या कर्तव्यावर होते. त्यावेळी महिंद्रा कंपनीच्या बोलेरो पिकअप क्रमांक एमएच १६ ओवाय ४०३९ वरील अज्ञात चालक तसेच हायड्रा क्रेन क्रमांक एमएच ४२ ओ ९२७० वरील अज्ञात चालक यांनी त्यांच्या ताब्यातील वाहने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालविल्यामुळे संबंधित वाहनांमुळे टोल नाक्यावरील टोल गेटच्या बूमला धडक बसून त्याचे नुकसान झाले. तसेच या प्रकारामुळे मानवी जीवितासह इतरांच्या वैयक्तिक सुरक्षिततेला धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने वाहन चालविण्यात आल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. घटनेनंतर दोन्ही वाहनांचे अज्ञात चालक घटनास्थळावरून निघून गेले.
या प्रकरणी योगेश बाळासाहेब सरोदे (वय ३७, व्यवसाय नोकरी, रा. तांदुळवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३८ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
घटनेमुळे पाटस टोलनाक्यावरील टोल गेटच्या यंत्रणेचे नुकसान झाले असून, संबंधित वाहनचालकांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार शिंदे करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार क्रमांक ९९३ करे यांनी केली.
प्रतिनिधी : Rjnews 27 मराठी




