ऊसतोड मजूर देण्याचे आमिष दाखवून १२ लाख ५० हजारांची फसवणूक; पिता-पुत्राविरुद्ध शिरूर पोलिसांत गुन्हा
शिरूर प्रतिनिधी : ऊसतोड मजूर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत वारंवार पैसे घेऊन तब्बल १२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सुरेश दल्नु चव्हाण व त्यांचा मुलगा रोशन सुरेश चव्हाण, दोघे रा. हारसवाडी, ता. कन्नड, जि. संभाजीनगर, यांच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मजूर उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली होणाऱ्या आर्थिक व्यवहारांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या प्रकरणी बाबुराव विठ्ठल कोळपे, वय ३६ वर्षे, व्यवसाय शेती, रा. कोळपेवस्ती, मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, सुरेश चव्हाण यांनी वारंवार फोन करून ऊसतोड मजूर उपलब्ध करून देण्यासाठी तसेच मजुरांना पैसे देण्याच्या कारणासाठी पैशांची मागणी केली होती.
सुरेश चव्हाण, त्यांचा मुलगा रोशन चव्हाण तसेच सुरेश चव्हाण यांच्या सांगण्यावरून सुनिल हिरालाल सोनवणे यांना फिर्यादीने फोन पे, आरटीजीएस आणि रोख स्वरूपात वेळोवेळी पैसे दिले. अशा प्रकारे एकूण १२ लाख ५० हजार रुपये देण्यात आले.
फिर्यादी बाबुराव कोळपे हे १ ऑक्टोबर २०२५ रोजी हारसवाडी, ता. कन्नड, जि. संभाजीनगर येथे गेले होते. त्यावेळी सुरेश चव्हाण व रोशन चव्हाण यांनी दोन दिवसांत मजूर घेऊन येण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे फिर्यादी तेथेच मुक्कामी राहिले. दोन दिवसांनंतर त्यांनी मजुरांबाबत विचारणा केली असता, मजूर घरी नसल्याचे आणि ते कुठे गेले आहेत याची माहिती नसल्याचे सांगून आणखी एक दिवस मुक्काम करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर मजूर गोळा करून देण्याचे आश्वासन देण्यात आले.
मात्र, त्यानंतरही मजूर उपलब्ध झाले नाहीत. पुन्हा विचारणा केली असता सुरेश चव्हाण व रोशन चव्हाण यांनी सध्या मजूर उपलब्ध नसल्याचे सांगत पैसे परत देण्याचे आश्वासन दिले. मात्र, आजपर्यंत पैसे परत करण्यात आले नसल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
वारंवार फोन करून विश्वास संपादन करणे, ऊसतोड मजुरांना पैसे द्यायचे असल्याचे सांगणे आणि ‘आज देतो, उद्या देतो’ असे आश्वासन देत १२ लाख ५० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात २३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजून ४३ मिनिटांनी नोंद करण्यात आली असून, गुन्हा क्रमांक ७५९/२०२६ असा आहे. फसवणुकीच्या या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.
या प्रकरणात सध्या आरोपींच्या अटकेबाबत तपास व कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, तपासादरम्यान आर्थिक व्यवहार, फोन कॉल्स, पैसे पाठविल्याचे पुरावे आणि संबंधित व्यक्तींची चौकशी याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
दाखल अंमलदार : पोलीस हवालदार २३४२ खपाले
तपास अधिकारी : पोलीस हवालदार २२७१ गवळी
फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपांची सत्यता तपासाच्या निष्कर्षानंतर स्पष्ट होईल.




