हॅकरच्या मुखवट्यातून विद्यार्थिनींना सायबर सुरक्षेचे धडे; पी.ई.एस. मॉडर्न गर्ल्स स्कूलमध्ये जनजागृती उपक्रम उत्साहात

 प्रतिनिधी : रमेश बनसोडे Rjnews27 मराठ 

वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थिनींमध्ये डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पी.ई.एस. मॉडर्न गर्ल्स स्कूल, पुणे येथे “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” या उपक्रमांतर्गत सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर परशुरामभाऊ महाविद्यालय (एस. पी. कॉलेज), पुणे आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची विशेष आकर्षण ठरले ते समिक्षा राऊत आणि श्रेया कुचेकर यांनी साकारलेले हॅकरचे प्रात्यक्षिक. हॅकरचा मुखवटा परिधान करून त्यांनी सायबर गुन्हेगारांची कार्यपद्धती, ऑनलाइन फसवणुकीच्या विविध युक्त्या आणि निष्काळजीपणामुळे होणारे धोके प्रभावी व नाट्यपूर्ण पद्धतीने विद्यार्थिनींसमोर उलगडले. या अभिनव सादरीकरणामुळे विद्यार्थिनींना सायबर गुन्ह्यांची माहिती सहज आणि समजण्यास सोप्या पद्धतीने मिळाली.

 

यानंतर झालेल्या मार्गदर्शन सत्रात फिशिंग हल्ले, ओटीपी व बँकिंग फसवणूक, बनावट लिंकची ओळख, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, मजबूत पासवर्ड तयार करण्याच्या पद्धती, वैयक्तिक माहितीचे संरक्षण, ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी तसेच डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

 

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले. संवादात्मक उपक्रमांमधून तज्ज्ञांनी विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन करत प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले. हॅकरच्या मुखवट्यातून सादर करण्यात आलेल्या प्रात्यक्षिकामुळे सायबर गुन्हेगारांच्या क्लृप्त्या आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय विद्यार्थिनींना अधिक प्रभावीपणे समजले.

 

कार्यक्रमाच्या समारोपावेळी विद्यार्थिनींना सायबर सुरक्षा विषयक माहितीपूर्ण पुस्तिकांचे वितरण करण्यात आले. या पुस्तिकांद्वारे सुरक्षित इंटरनेट वापर, गोपनीय माहितीचे संरक्षण आणि डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.

 

वाढत्या डिजिटल युगात सायबर सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेता अशा प्रकारचे जनजागृती उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित डिजिटल सवयी रुजविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. विद्यार्थिनींना सजग, सुरक्षित आणि जबाबदार डिजिटल नागरिक म्हणून घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रभावी ठरल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *