तांदळीतील विकासकामाच्या भूमिपूजन फलकाची तोडफोड; अज्ञाताविरोधात शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

तांदळी, ता. शिरूर (प्रतिनिधी) : अल्लाउद्दीन अलवी 

शिरूर तालुक्यातील तांदळी येथे आमदार माऊली आबा कटके यांच्या स्थानिक आमदार विकास निधी (२०२५-२६) अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या विकासकामाच्या भूमिपूजन फलकाची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तांदळी ते म्हसोबावाडी मळई रस्ता या विकासकामासाठी स्थानिक आमदार विकास निधीतून सुमारे १० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामाच्या भूमिपूजनानिमित्त सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने अधिकृत फलक उभारण्यात आला होता. मात्र अज्ञात व्यक्तीने या फलकावर खाडाखोड करून त्याचे नुकसान केले तसेच फलक वाकवून त्याची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेमुळे केवळ विकासकामाच्या फलकाचे नुकसान झाले नसून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकृत शासकीय फलकाचाही अवमान झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारामुळे परिसरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या प्रकरणी गणेगाव दुमाला येथील ऋषिकेश निंबाळकर यांनी फिर्याद दिल्यानंतर शिरूर पोलीस ठाण्यात दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२४(४) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, संबंधित आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरत असल्याची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना देण्यात आली.

दरम्यान, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणाऱ्या आणि विकासकामांमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *