देऊळगाव राजे येथे दौंड पोलिसांची धडक कारवाई; चार हॉटेल चालकांकडून बेकायदा मद्यसाठा जप्त

दौंड, प्रतिनिधी :विकास साळुंके 

देऊळगाव राजे (ता. दौंड) परिसरात बेकायदा मद्यविक्रीविरोधात दौंड पोलिसांनी विशेष मोहीम राबवत चार वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई केली. या कारवाईत चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून हजारो रुपयांचा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध मद्यविक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई ओमनाथ निळकंठ तुमकुटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २ जून रोजी सायंकाळी देऊळगाव राजे गावातील विविध हॉटेलांवर छापे टाकण्यात आले. यावेळी संबंधित आरोपी विनापरवाना आर्थिक फायद्यासाठी बेकायदा मद्यविक्री करत असल्याचे आढळून आले.
पहिल्या कारवाईत हॉटेल महालक्ष्मी येथे समीर झुंबर अंबेकर (रा. आवीबेट, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याच्याकडून १ हजार ४० रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. त्याच्याकडे टॅगो पंच कंपनीच्या १८० मिलीच्या १३ सिलबंद बाटल्या आढळून आल्या.
त्यानंतर हॉटेल तुळजाभवानी येथे विजय बबन अवचर (रा. देऊळगाव राजे, ता. दौंड) याच्याकडून १ हजार ४६० रुपयांचा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला. यामध्ये टॅगो पंच व क्लासिक गोल्ड कंपनीच्या मद्याच्या बाटल्यांचा समावेश होता.
तिसऱ्या कारवाईत हॉटेल कोमल येथे गणेश गौतम अवचर (रा. देऊळगाव राजे) याच्याकडून १ हजार ३५० रुपयांचा डर्बी स्पेशल कंपनीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. त्याच्याकडे १८० मिलीच्या नऊ सिलबंद बाटल्या आढळून आल्या.
याच हॉटेल परिसरात करण्यात आलेल्या आणखी एका कारवाईत नवनाथ रामचंद्र सूर्यवंशी (रा. देऊळगाव राजे) याच्याकडून १ हजार ६५० रुपयांचा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला. संबंधित व्यक्ती बेकायदेशीररीत्या मद्यविक्री करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
सर्व कारवाईदरम्यान पोलिसांनी पंचांसमक्ष जप्ती पंचनामे करून मद्याच्या बाटल्या ताब्यात घेतल्या. तपासणीसाठी नमुने राखून ठेवण्यात आले असून त्यांना पोलिस व पंचांच्या सीलने सुरक्षित करण्यात आले आहे.
ही संपूर्ण कारवाई दौंड पोलीस स्टेशनच्या पथकाने केली. जप्त केलेला मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून संबंधित आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे. पुढील तपास पोलीस हवालदार लोहार, चव्हाण आणि म्हेत्रे हे करीत आहेत.
देऊळगाव राजे परिसरात सुरू असलेल्या अवैध मद्यविक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *