सबजेलमध्ये दाखल करण्यासाठी नेत असताना आरोपीची पोलिसांच्या तावडीतून धूम; दौंड पोलीस ठाण्यासमोर थरार

दौंड, प्रतिनिधी :विकास साळुंके 

यवत पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलिसांच्या ताब्यातून पळ काढल्याची धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यासमोर घडली आहे. या प्रकारामुळे पोलिस यंत्रणेत एकच खळबळ उडाली असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, यवत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी व्यंकटेश नान तरपतैया (वय 30, रा. येल्लूर, आंध्रप्रदेश) याला तपासासाठी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला दौंड उपकारागृहात दाखल करण्यासाठी पोलीस हवालदार विकास कापरे व पोलीस कॉन्स्टेबल किरण तुपे हे घेऊन जात होते.
दरम्यान, 1 जून रोजी सायंकाळी सुमारे 7.55 वाजण्याच्या सुमारास दौंड पोलीस ठाण्यासमोर वाहन थांबले असताना आरोपीने अचानक वाहनाचा दरवाजा उघडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल किरण तुपे यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने त्यांना जोराचा धक्का देत खाली पाडले आणि घटनास्थळावरून पसार झाला.
आरोपी फरार झाल्याची माहिती मिळताच पोलीस प्रशासन सतर्क झाले असून परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. विविध ठिकाणी नाकाबंदी करून आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे पोलिसांच्या ताब्यातील आरोपींच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अधिकारी घाडगे करीत आहेत. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विषय : “दौंड पोलीस ठाण्यासमोर आरोपीचा थरारक पलायन; पोलिसांना धक्का देत झाला फरार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *